भाजप नेत्यांना निवडून आणू शकत नाही का ? ; कार्यकर्त्यांमध्येच सुरु झाली कुजबुज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाच वर्षातील दामदार कामगिरी, पुलवामा हल्ल्यानंतर केलेला बालाकोटचा एअर स्ट्राईक, विरोधी पक्षांचा एकमेकांशी नसलेला ताळमेळ अशी सर्व अनुकुल परिस्थिती असतानाही भाजप क्रिकेटपटु, अभिनेते, संत यांना बालेकिल्ल्यातून उभे करीत आहेत. त्यामुळे भाजप आपल्या नेत्यांना निवडून आणू शकत नाही का अशी कुजबुज खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये सुरु झाल्याचे दिसून येऊ लागले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळ या भाजपच्या बालेकिल्ल्यातून दिलेली उमेदवारी वादग्रस्त ठरली आहे. ज्या ठिकाणी गेली ३० वर्षे भाजपच निवडून येत आहे. अशा ठिकाणी साध्वीला उमेदवारी देण्याचे कारण काय असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला होता. त्यात तिने शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही संताप उफाळून आला आहे.

त्याचवेळी शेवटच्या क्षणी भाजपने अभिनेते, किक्रेटपटू, गायक यांना उमेदवारी देण्याचा सपाटा लावला आहे. त्याचबरोबर अन्य पक्षातील नेत्यांचीही आयात अखेरच्या क्षणी सुरु आहे. त्यामुळे भाजप आपल्या बळावर कार्यकर्त्यांना निवडून आणू शकत नाही का, अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.

भाजपने किक्रेटपटू गौतम गंभीर याला पक्षात घेतले आणि तातडीने दिल्लीत उमेदवारीही जाहीर केली. त्यासाठी विद्यमान खासदारांचे तिकीट कापले. त्यापाठोपाठ अभिनेते सनी देओल यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना गुरुदासपूर येथून तिकीट देण्यात आले आहे. गायक उदीत राज यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी कोणाला मिळणार असे निवडणुकी अगोदर भाजप नेत्यांना विचारले की, ते सांगत होते की, आमची स्थानिक कमिटी उमेदवारांची नावे निश्चित करुन राज्य समितीकडे पाठविते. त्यानंतर त्या नावांचा संसदीय समितीमध्ये विचार होऊन उमेदवारांची नावे निश्चित केली जातात. ही त्यांची सर्वसाधारण प्रक्रिया असल्याचे सांगितले जाते. मग, साध्वी प्रज्ञा सिंह, सनीदेओल, गौतम गंभीर यांच्यासारख्या अनेक स्टार व्यक्तीची नावे कोणत्या स्थानिक समितीने आणि कधी निश्चित केली होती, अशी चर्चा आता कार्यकर्ते करु लागले आहेत.

इतकी अनुकुल परिस्थिती असताना त्यात वर्षोनुवर्षे काम करणारे कार्यकर्ते, नेते हे लोकसभेत जाऊ शकले असते. असे असताना त्यांना संधी न देता जे निवडून आले तरी सभागृह उपस्थित राहण्याची अथवा काही प्रश्न विचारण्याची जरासुद्धा शक्यता नाही, अशांना का उमेदवारी देत आहे? खरंच भाजपला अनुकूल वातावरण आहे का?अशी शंका कार्यकर्त्यांना येऊ लागली आहे. विशेषत: ज्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या. त्यांनाही आपल्या भागाचे चित्र स्पष्ट होत नसल्याने अशा शंकाने त्यांना सतावून सोडले असल्याचे काहींचे म्हणणे आहे.