‘आमदार हटाव’ची मोहीम उघडून ‘शिवाजीनगर’मध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून ‘घरचा आहेर’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम कालावधी राहिलेला असताना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी दंड थोपटले आहेत. निवडणुकीसह विकासकामाबाबत आमदारांनी मतदारसंघात बोलावलेल्या बैठकीवरच ‘बहिष्कार’ घालून कार्यकर्त्यांनी ‘आमदार हटाव’ ची मोहीम खुलेआम उघडून ‘घरचा आहेर ‘ दिला आहे.

याबाबत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे विद्यमान आमदार विजय काळे यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज झाले आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहूनही स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवरून कार्यकर्ते संतप्त बनले आहेत. जे यापूर्वी पक्षाच्या विरोधात होते, दुसऱ्या पक्षातून भाजपवर टीका करत होते. अशा काही व्यक्तींना भाजपमध्ये स्थान दिल्यावरून कार्यकर्त्यांनी थेट आमदार विजय काळे हटाव मोहीम उघडली आहे. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत काम न करण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतून ‘आयात ‘ झालेल्यांची आमदारांनी स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावल्याचा आक्षेप कार्यकर्त्यांचा आहे.त्यामुळे सोशल मीडियावर खुलेआम आमदार हटाव मोहीम राबविली जात असून विद्यमान आमदारांना ‘घरचा रस्ता’ दाखविण्यासाठी पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी एकीची मोट बांधली आहे.

गतवेळी मोदी लाटेमुळे विद्यमान आमदारांना ‘लॉटरी ‘ लागली ;पण कार्यकर्त्यांनीही झोकून काम केले मग पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची कि बाहेरून पक्षात आलेल्या लोकांना ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर मतदारसंघात कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पक्षाचे वर्चस्व वाढले आहे, त्यात विद्यमान आमदारांचे काही एक योगदान नाही याकडेही कार्यकर्त्यांच्या वर्तुळातून लक्ष वेधले जात असून शिवसेनेकडून या मतदारसंघावर डोळा आहे. त्यासाठी ‘आमदारकी’ची हौस भागविण्यासाठी इच्छुक असलेल्या एका व्यक्तीला पोषक वातावरण निर्माण करण्याची खेळी सुरु आहे. ती हाणून पाडण्यासाठी आणि मतदारसंघावर भाजपचाच दावा सांगण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे ;पण ‘आयात ‘ व्यक्तींना पदे देण्यासाठी भाजपमधीलच वरिष्ठ ‘खतपाणी ‘ घालत असल्याचा आरोपही कार्यकर्त्याचा आहे . त्यानुसार विद्यमान आमदारांची कार्यपद्धत असल्याचा दावाही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

आमदार विजय काळे यांनी विकासकामे आणि आगामी निवडणुकीबाबत एका बैठकीचे आयोजन केले होते,मात्र या बैठकीकडेच कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली ;पण त्याआधी सोशल मीडिया ग्रुपवरून या बैठकीला न जाण्याबाबत आवाहन करताना ‘विद्यमान आमदार हटाव’वर भर देण्यात आल्याने शिवाजीनगर मतदारसंघात भाजपमध्ये विद्यमान आमदार विरुद्ध सर्व पदाधिकारी -कार्यकर्ते असा ‘सामना ‘ निवडणुकीआधीच रंगला आहे. आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?