सावधान ! नाश्त्यासाठी रोज बेकरी पदार्थ खाताय ? मग ही बातमी नक्की वाचा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेकजणांना आपल्या दिवसाची सुरुवात चहा बिस्कीट, ब्रेड अशा पदार्थांचे सेवन करूनच करण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत आहे का ब्रेड, बिस्कीट अशा मैदा जन्य पदार्थांच्या रोज़च्या सेवनामुळे शरीरावर काय परिणाम होतात.

जेव्हा गव्हाचा मैदा होतो

मैदा हा खरं तर गव्हापासूनच बनणारा पदार्थ आहे. गहू हे आयुर्वेदानं नित्य सेवनीय म्हणजे रोज खाण्याची वस्तू आहे असं सांगितलं आहे. पण त्याचाच मैदा झाला की मात्र त्याचे गुणधर्म बदलतात. मैदा बनवताना गव्हाचा कोंडा पूर्णपणे काढून टाकला जातो, त्यामुळे गव्हातील तंतूमय घटकासारखे महत्त्वाचे घटक निघून जातात. आणि केवळ कर्बोदकं म्हणजे ग्लूटेन शिल्लक राहतं. यामुळेच मैदा भिजवला की अगदी चिकट होतो आणि खूप ताणला जाऊ शकतो. पण त्याचवेळी तो पचायला अतिशय जड होतो.

काय होतो परिणाम ?

१) चरबीचे प्रमाण वाढते

मैद्याचे पचन करण्यासाठी शरीरातील मॅग्नेशिअम वापरलं जातं आणि ते लवकर भरून काढता येत नाही. अपूर्ण पचन सतत होत राहिल्यामुळे मेद धातू मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागतो आणि ही वाढलेली चरबी प्रचंड प्रमाणात वजन वाढणे, स्थूलता यात परिवर्तित होते.

२) पोटाच्या तक्रारी होतात

बेकरीचे पदार्थ बनवताना आंबवण्याची जी प्रक्रिया केली जाते त्यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत, पोटात आग होणं, गॅसेस, पोट गुबारणे या तक्रारी निर्माण होतात त्या वेगळ्याच!

३) स्थूलता वाढते

बेकरीच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरली जाते आणि बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात बिस्किटं खाऊन होते. उपाशीपोटी रोज अशी साखर पोटात जाणं हेही वाढत्या स्थूलतेचं महत्त्वाचं कारण आहे.

४) त्वचा आणि केसांवर परिणाम

बेकरीच्या जवळपास सगळ्या पदार्थांमध्ये चवीपुरतं का होईना; पण मीठ असतंच! पफ्स किंवा खारी यामध्ये तर मीठ जरा जास्तच प्रमाणात असतं आणि नियमितपणे दुधात किंवा चहात बुडवून खारी खाणारे अनेकजण आहेत. पण हे विरुद्ध अन्न आहे. त्वचेवर लवकर सुरकुत्या पडणं, केस गळणं, अकाली पांढरे होणं असे परिणाम कालांतरानं होऊ शकतात.

चवीत बदल म्हणून हे पदार्थ खायचे झाल्यास ते चांगल्या दर्जाचे, स्वच्छ चांगल्या, विश्वास ठेवण्यायोग्य बेकरीत बनवलेलेच खावेत.ब्रेड बटर, ब्रेड जॅम किंवा सॅण्डविचेस हे काही आपलं नियमित खाणं नव्हे. फॅशन म्हणून, सोय म्हणून नेहमी याचा वापर केला, तर फायद्यापेक्षा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यताच जास्त आहे. म्हणून, बेकरीच्या पदार्थांबाबत जरा जपूनच!