५० हजाराची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अनामत रक्कमेचा चेक देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राजाराम बारकु सांगळे (वय-४३ रा. रुपाई नगर, साक्री) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी वार गावचे माजी सरपंच (वय-५६) यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे वार गावचे माजी सरपंच आहेत. सरपंच असताना गावाच्या विकास कामासाठी त्यांनी १ लाख ४८ हजार रुपयांची अनामत रक्कम भरली होती. अनामत रक्कमेचा चेक देण्यासाठी ग्रामसेवक सांगळे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

पथकाने आज पंचासमक्ष पडताळणी केली असता सांगळे याने लाच मागितल्याचे उघड झाले. पथकाच्या अधिका-यांनी तक्रारदार यांना २५ हजार रुपयांची रोकड आणि २५ हजार रुपयांच्या डमी नोटा दिल्या. तक्रारदाराकडून लाच स्विकारताना ग्रामसेवक सांगळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर आणि त्यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.