2000 रुपयाची लाच घेताना मंडळ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शेतमालकाच्या नावाने केलेल्या अर्जाची चौकशी करून, खरेदीदार व शेती मालक यांचे जबाब नोंदवून प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेताना दिंडोरी तालुक्यातील नानाशी येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दिंडोरी तहसिल कार्यालयाच्या पाठिमागील पार्किंगमध्ये करण्यात आली. वसंत यशवंत खोटरे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर नवीन शर्तीची शेत जमीन खरेदी करण्यासाठी शेतमालकाच्या नावाने केलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी आणि खरेदीदार व शेती माल यांचे जबाब नोंदवून प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी खोटरे याने 2 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी खोटरे याने लाचेची रक्कम तहसील कार्यालयाच्या पाठिमागे असलेल्या पार्किंगमध्ये स्विकारण्याचे कबूल केले.

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पार्किंमध्ये सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना वसंत खोटरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. खोटरे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.