विधानसभा 2019 : कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघामध्ये ‘चुरस’ ! काँग्रेस भाजपला रोखणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्ह्यातील राखीव मतदारसंघांपैकी एक असलेला कॅन्टोंन्मेट विधानसभा मतदारसंघामध्ये कायमच चुरस पाहायला मिळाली आहे. या मतदारसंघाला सलग दोन सत्तांमध्ये अनुक्रमे कॉंग्रेस आणि भाजपला राज्यमंत्री पदे मिळाली आहेत. परंतू दोन्ही वेळेस ही पदे अल्पकालीन ठरली आहेत. आमदारांप्रती नाराजी मतांच्या कौलातून दिली जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने भाजप सावध झाले असून याठिकाणी उमेदवार बदलून मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास प्रयत्नशील आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये उर्वरीत पाचही मतदारसंघातून भाजपला भरभरून मतदान झाले असले तरी कॉंग्रेसने या मतदारसंघामध्ये भाजपला रोखल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल, असे चित्र आहे.

दहा वर्षांपुर्वी मतदारसंघांच्या पुर्नरचनेनंतर पुणे कॅन्टोंन्मेट मतदारसंघ अनुसुचित जाती- जमातीसाठी राखीव झाला आहे. २००५ मध्ये पर्वती मतदारसंघातून विजयी झालेले कॉंग्रेसचे रमेश बागवे यांनी २००९ मध्ये कॅन्टोंन्मेट मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि विजयी झाले. दुसर्‍यांदा आमदार झालेल्या बागवे यांच्या गळ्यात गृहराज्य मंत्री पदाची माळ पडली. परंतू २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपच्या दिलीप कांबळे यांच्याकडून बागवे यांना पराभव पत्करावा लागला. दिलीप कांबळे यांना राज्यमंत्री मंडळामध्ये समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्रीपदही मिळाले. तत्पुर्वी सहा महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना या मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते, त्याचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. विशेष असे की मागीलवेळी भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते.

दरम्यान, नुकतेच काही महिन्यांपुर्वी दिलीप कांबळे यांना राज्यमंत्रीमंडळातून डिच्चू मिळाला आहे. मंत्रीपदाच्या काळात काही ठिकाणी केलेली वादग्रस्त वक्तव्य आणि औरंगाबादमध्ये त्यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला आहे. अशातच नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप युतीचे उमेदवार गिरीश बापट सव्वातीन लाख मतानी विजयी झाले. परंतू कॅन्टोंन्मेट मतदारसंघातून त्यांना जेमतेम १३ हजारांची नाममात्र आघाडी मिळाली. यामुळे कांबळे यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये जिंकण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने सावध भुमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीसाठीही खुद्द मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघाचा सर्व्हे करून घेतला असून उमेदवार बदलाचे निश्‍चित केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू पुणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांच्या नावाला प्रथम पसंती दिली आहे. कांबळे यांच्यासोबतच डॉ. भरत वैरागे, किरण कांबळे, सुखदेव अडागळे, कॅन्टोंन्मेट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अतुल गायकवाड, सुनिल माने यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. परंतू पाचवेळा नगरसेवक म्हणून काम पाहीलेले तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघात गेली अनेकवर्षे कार्यरत असलेले सुनिल कांबळे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची चिन्हे आहेत.

कॉंग्रेस आघाडीकडून रमेश बागवे यांचेच नाव जवळपास निश्‍चित असून माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी देखिल उमेदवारी मागितली आहे. बागवे यांची भाजप व अन्य पक्षातील पदाधिकार्‍यांशी जवळीक आहे, तसेच सुनिल कांबळे देखिल बेरजेचे राजकारण करण्यात पटाईत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही लढत पक्षासोबतच वैयक्तिक संबधांवरही लढविली जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. महायुतीतील मित्र पक्ष रिपाइं ने देखिल या मतदारसंघाची मागणी केली आहे. परंतू आरपीआय मधील गटातटाच्या राजकारणामुळे संपुर्ण शहरातच आरपीआयचे सर्व अवलंबीत्व भाजपवर असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे भाजपकडून ही जागा रिपाइंला सोडण्याची शक्यता फारच कमी आहे.

तसेच भाजप आणि शिवसेना युती तुटल्यास शिवसेनेच्यावतीने नगरसेविका पल्लवी शेखर जावळे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. परंतू राजकारणात एका रात्रीत अनेक बदल घडत असल्याचे पाहायला मिळत असल्याने तूर्तास उमेदवारी जाहीर होईपर्यंत तरी कॅन्टोंन्मेट मतदारसंघाचे चित्र वरिल प्रमाणे राहाणार असल्याचे दिसते.

Visit : policenama.com