राज ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली नसती तर मतं ‘सैरभैर’ झाली असती : छगन भुजबळ

मुंबई : वृत्तसंस्था – राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर मतं सैरभैर झाली असती. मात्र त्यांनी रोखठोक भूमिका घेतल्याने त्याचा आघाडीला मोठा फायदा मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ यांनी पूर्वीचे राजकीय वैर आता नाही आणि राजकारणात आरोप- प्रत्यारोप होतच असतात,याचा अर्थ संबंध बिघडत नाहीत असे स्पष्ट करून राज ठाकरे यांच्या सभेचे वेगळेपण असते आणि त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षण असते ,अशा शब्दात भुजबळ यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.

राज ठाकरे यांना मानणारे मतदार नाशिकमध्ये आहेत या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांना फायदा होईल का यावर बोलताना भूजबळ यांनी जर ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली नसती तर काही मते सेनेला तर काही मते राष्ट्रवादीला मिळाली असती मात्र त्यांनी ठोस भूमिका घेतल्याने आघाडीलाच त्याचा फायदा होणार असून मतांचे प्रमाण वाढणार आहे,असेही स्पष्ट केले.

बहुजन वंचित आघाडीवर टीका करताना छगन भुजबळ यांनी त्यांनी उमेदवार दिले नसते तर ती मते आघाडीला मिळाली असती पण आता ही तूट मनसे आणि शेतकरी संघटनेच्या मतांनी भरून निघणार आहे असा ठाम दावाही त्यांनी केला.