देवपुरमध्ये चोरट्यांचा उच्छाद, सोनसाखळी चोरीची चौथी घटना

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून देवपुरमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. देवपुरातील पिंपळनेर येथील एका महिलेची ३७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेली. आत्तापर्यंत या परिसरात घडलेली ही चौथी घटना आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देवपुर परिसरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी तीन ठिकाणी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकामारून चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच रविवारी (दि.४) रात्री पिंपळनेर येथील रत्नाबाई नारायण वाघ (वय-४४) या महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन चोरट्यांनी महिलेला धक्का मारून गळ्यातील सोनसाखळी हिसकामारून चोरून नेली.

यापूर्वी घडलेल्या घटनेतही चोरट्यांनी महिलांना धक्कामारून सोनसाखळी चोरून नेल्या आहेत. चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगात येतात आणि महिलांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील किंमती सोनसाखळी चोरून नेत असल्याचे आत्तापर्यंतच्या घटनांवरून दिसून येत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत असताना मात्र, पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने चोरट्यांच्या मनात पोलिसांविषयी भिती राहिलेली नाही. त्यामुळेच चोरटे संधी साधून चोरी करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. देवपुर पोलीसांनी दोन अज्ञात दुचाकी स्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आय. एन. ईशी करीत आहेत.