अहमदनगर : राज्यात सोन साखळ्यांची चोरी करून धुमाकूळ घालणार्‍या इराणी टोळीला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये चैन स्नेचिंग करणाऱ्या इराणी टोळीच्या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने राज्यात अनेक ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीतील दोघांनी मार्च २०१९ मध्ये नेप्ते गावच्या हद्दीमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसका मारून चोरून नेली होती. या घटनेत महिला गाडीवरून पडून जखमी झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

आझादअली युसूफ सय्यद उर्फ इराणी (वय-३७), आयुब उर्फ भुऱ्या फैय्याज इराणी (वय-५०), अलरजा उर्फ अल्लीबाबा शब्बीर बेग उर्फ इराणी (वय-४५) आणि अकबर शेरखान पठाण (वय-३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी साहेबराव गंगा बरबडे (वय-५७ रा. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप मोहिते यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. आरोपी हे श्रीरामपूर येथील राहणारे असून त्यांनी हा गुन्हा केला आहे. तसेच आरोपी त्यांच्या घरी आले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी अकबर पठाण याच्यावर ३६ गुन्हे, अल्लीबाबा बेग याच्यावर ३२, आयुब इराणी -१७ गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी पुणे जिल्ह्यातील हडपसर, स्वारगेट, दत्तवाडी, चतु:श्रृंगी, विश्रांतवाडी, एमआयडीसी भोसरी, कोथरूड, वारजे माळवाडी, निगडी, पिंपरी, मुंढवा, येरवडा, चिंचवड परिसरात सोन साखळी चोरी केली आहे.

ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे-कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, मन्सूर सय्यद, सोन्याबापू नानेकर, बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, रविंद्र कर्डीले, आण्णा पवार, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, विशाल दळवी, संदीप घोडके, मच्छिंद्र बर्डे, सागर सुलाने, संदीप दरंदले, राम माळी, बबन बेरड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –