सत्तेचे सूत्रधार खऱ्या अर्थाने बदलणार ?, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून काय काम केले याची झाडाझडती होणार आहे. दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत आज (8 ऑगस्टल) सकाळी 9 वाजता डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे ही बैठक होणार आहे. पालकमंत्री झाल्यानंतर पाटील हे प्रथमच ही बैठक घेणार असल्याने पुण्यातील सत्तेचे सूत्रधार खऱ्या अर्थाने बदलणार ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. केंद्रात, राज्यात सत्ता आल्यानंतर पालिकेत बहुमताने सत्ता आल्याने भाजपचा भाव एकदमच वधारला. यासोबतच निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे याची जबाबदारी एकप्रकारे भाजपवर आली.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री पद भूषविणारे गिरीष बापट यांचाच प्रभाव महापालिकेवर होता. पालिकेतील पदाधिकारी आणि विषय समित्यांच्या निवाडीमध्ये बापट यांचेच वर्चस्व राहिले. मात्र नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुणे लोकसभा मतदार संघातून बापट यांना उमेदवारी दिली. ते निवडून आल्यानंतर त्यांनी मंत्रिपद आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पालकमंत्री पदाची सूत्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली. परंतु अल्पावधीतच त्यांच्याकडे भाजप प्रदेश अध्यक्षपदाची ही धुरा सोपवण्यात आली.

मात्र यानंतर चंद्रकांत पाटील हे पुण्यातील एका विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही इकचुकांमध्ये आणि विद्यमान आमदारांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे. पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष व मंत्रिपद अशी बहुपदरी जबाबदारी सांभाळताना होणारी दमछाक पाहता कालच पुण्याच्या सहपालकमंत्री पदी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचे घरचे मैदान असलेले कोल्हापूर हे पुरामुळे दयनीय परिस्थितीत अडकले असताना पाटील यांनी पालिकेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांची आढावा बैठक लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शहरातील प्रकल्पांची स्थिती आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे कारण वरकरणी दिसत असले तरी, त्यामागे आगामी निवडणुका आणि उमेदवारीची चाचपणी हेच गणित असल्याची चर्चा प्रामुख्याने भाजप वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.