‘शुगर’ असतानाही भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांनी खाल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ‘बारामती’चा लाडू !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीत ‘कमळ’ फुलविण्याची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांना खुले आव्हान देणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात जाऊन बारा किलो लाडू भेट म्हणून दिले. यावेळी मला ‘शुगर’ आहे, असे स्पष्ट करणाऱ्या पाटलांना एक तरी लाडू खा असा आग्रह केल्यानंतर पाटीलांनी एक लाडू खाऊन शुभेच्छा तर दिल्या शिवाय पवार घराण्याशी माझे चांगले संबंध आहेत, बारामतीत आल्यानंतर नक्की पवारांच्या घरी भेट देऊ अशी ग्वाहीही दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव व्हावा यासाठी चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून होते. भाजपाने आखलेला डाव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हाणून पाडला. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे तब्बल दीड लाख मतांनी निवडून आल्या. भाजपाकडून या मतदारसंघात रासपचे दौडमधील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे बारामतीची लढत रंगतदार झाली होती.

बारामती जिंकण्याचा चंग भाजपाने केला होता. बारामती जिंकणारच या आशेने चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना मुलीच्या पराभवाची चिंता सतावत आहे. त्यामुळे त्यांना झोप लागत नाही असा टोला लगावला होता. दरम्यान निकाल लागल्यानंतर बारामतीत पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंना विजय प्राप्त झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट म्हणून दिले. यावेळी चंद्रकांतदादांनीही त्यांचे स्वागत करत मला शुगर असल्याने गोड खात नाही असे म्हटले. त्यावर कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर एक लाडू खाल्ला. तसेच सुप्रिया सुळे यांच्याशी चांगले संबंध आहेत. बारामतीत पुन्हा आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन भेट देऊ असेही चंद्रकांतदादांनी सांगितले.