१८ पथकांकडून ‘त्या’ १२६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी ; आज मिळणार अहवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकानात मुदतबाह्य कीटकनाशके आढळल्यानंतर कृषी विभागाने जिल्हाभरातील तब्बल १२६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली आहे. सदर तपासणीचा अहवाल आज मिळण्याची शक्यता आहे. बहुसंख्य कृषी सेवा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात मुदतबाह्य किटकनाशके आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने जिल्हाभरातच तपासणी मोहीम राबवली. बाजार समितीच्या आवारातील पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर भरारी पथकाने छापा टाकून मुदतबाह्य झालेली किटकनाशके जप्त केली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने जिल्हाभरात खळबळ उडाली. या प्रकाराची जिल्हा प्रशासनानेदेखील गंभीर दखल घेतली. जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाने एकूण १८ पथके तयार केली.

एका तालुक्यातील पथकाला दुसऱ्या तालुक्यात पाठवण्यात आले. या पथकांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. केंद्रातील किटकनाशके मुदतबाह्य झाली आहेत का, खरेदी-विक्री रजिस्टरवर नोंदी घेतल्या जात आहेत का, याबाबत तपासणी करण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात या कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता या तपासणीचे अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तपासणी अहवाल कृषी विभागाकडून सादर केले जाणार आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत काय त्रुटी आढळल्या, याची माहिती या अहवालातून मिळणार आहे. सदर अहवाल आज जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.