बँका वाचविण्याची सर्वस्वी जबाबदारी संचालक मंडळाची : छगन भुजबळ

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सहकार क्षेत्राची निर्मिती ही सर्वसामान्य नागरिकांची पत निर्माण करण्यासाठी झाली. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत होऊ लागली. मात्र या क्षेत्रातील बँका बुडाल्या तर याचा फटका हा संपूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो त्यामुळे या बँका वाचविण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी सर्वस्वी संचालक मंडळाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक मर्चंटस को- ऑपरेटिव्ह बँकेच्या लासलगाव शाखेच्या नूतनीकरण समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार वसंत गीते, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, बाजार समिती संचालक पंढरीनाथ थोरे, निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी सुरासे, पिंपळगाव नजिकच्या सरपंच सुनीता शिंदे रंजन ठाकरे, रतन राका, कैलास सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, नितीन जैन, नंदूशेठ डागा,शिवदास डागा, संजय होळकर, संजय कासट, सुमातीलाल अब्बड, विजय साने, गिरीश साबद्रा, संतोष पलोड, रवी होळकर, योगेश पाटील, अविनाश कोठी, डॉ.सुजित गुंजाळ, पुरुषोत्तम चौथनी, सुरेश पवार, राजु राणा, अफजल शेख, मनोज जैन यांच्यासह बँकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, स्व.हुकूमचंद बागमार आणि सहकाऱ्यांनी १९५९ साली या बँकेचे रोपटे लावले गेले आज बँकेचे एक लाख ८० हजार सभासद निर्माण झाले हे बँकेचे मोठं यश आहे. पत नसलेल्याची पत निर्माण करण्यासाठी सहकार क्षेत्राची निर्मिती झाली. यात अनेक संस्था बुडाल्या मात्र आपल्या सारख्या बँकांनी आजही विश्वास टिकविला आहे. बँकेच्या यशासाठी संचालक मंडळाने या बँकेच्या यशामागे मोठे योगदान दिले.प्रशासक असतांना देखील जेवढ्या सुधारणा झाल्या नाही त्या संचालक मंडळाने करून दाखविल्या. त्याबद्दल त्यांचे आभार मानत बँका बुडल्यानंतर सर्वसामान्य लोक अडचणीत येत असतात त्यामुळे संचालक मंडळाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत असून दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील योजना आणली जात आहे. तसेच अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी शासनाने आखलेल्या विविध योजनांची माहिती दिली.