मुख्यमंत्र्यांच्या मार्गातील अडथळे झाले ‘दूर’, ‘दावेदार’ पडले पिछाडीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – गेली पाच वर्षे सातत्याने इलेक्शन मोडमध्ये असलेल्या व सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत अनेक खेळी करुन पक्षातील आपल्याला पुढील काळात टक्कर देऊ शकतील, अशा सर्व दिग्गजांना बाजूला सारले आहे. काहींना निवडणुकीच्या आधी तर काही जण निवडणुकीतील अपयशाने दूर फेकले गेले आहेत. त्यामुळे भाजपाला यश कमी मिळाले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदासाठीचे दावेदार शिल्लक राहिलेले नाही.

देवेंद्र फडणवीस पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले. तेव्हा खरंतर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा या पदावर हक्क होता. पण, ग्रामीण बाज असलेल्या खडसे यांच्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना आपली बाजू अधिक सक्षमपणे समजावून सांगू शकले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ यांच्या गळ्यात पडली. फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी त्यांना नेहमीच खडसे यांची भिती होती. त्यामुळे पुण्यातील जमीन प्रकरणात त्यांना अलगदपणे मंत्रीमंडळातून बाजुला केले गेले.

त्यावेळी चौकशी पूर्ण झाल्यावर पुन्हा मंत्रीमंडळात घेऊ असे आश्वासन दिले गेले. पण पाच वर्षात ना चौकशी पूर्ण झाली ना त्याचा अहवाल जाहीर झाला ना खडसे पुन्हा मंत्रीमंडळात आले. आता तर त्यांचे तिकीट कापले. त्यांनी बंडखोरी करु नये, म्हणून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली गेली. त्याचवेळी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मदत करुन रोहिणी खडसे यांचा पराभव करवून आणला.

दुसरीकडे आणखी एक प्रतिस्पर्धी विनोद तावडे यांना तिकीटच मिळू नये, अशी व्यवस्था करण्यात आली. नागपूरचे पालकमंत्री आणि धडाडीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच वर्षात चांगली कामगिरी केली. मात्र, त्यांना तिकीट नाकारुन पत्नीला उमेदवारी देण्यात आली व आणखी एक संभाव्य स्पधर्काला त्यांनी बाजूला काढले.

ज्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे समर्थक करीत होते, त्या पंकजा मुंडे यांचा त्यांना भविष्यात धोका होता. मुंडे यांनी आपली महत्वाकांक्षा कधीही लपवून ठेवली नव्हती. परळीतील अटीतटीच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव करुन मुख्यमंत्र्यांच्या वाटेतील काटा अलगद बाजूला केला आहे.
महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुडमधून भले निवडून आले असले तरी त्यांचा रुबाब कमी झाला आहे.

तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य असलेल्या कोथरुडमध्ये ते केवळ २६ हजार मतांनी निवडून आले. शिवाय त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपाला भोपळा हाती लागला आहे. त्यांची स्पर्धा सध्यातरी संपली आहे. संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपाची चांगलीच पिछेहाट झाली आहे. शिवसेनेचा दबाव यापुढील काळात वाढणार आहे. त्यामुळे पाच वर्षे शिवसेनेला चांगल्या प्रकारे हाताळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आता मुख्यमंत्रीपदासाठीचा स्पर्धक राहिलेला नाही.

Visit : policenama.com