चिंचवडमध्ये कलाटेंची ‘बॅटिंग’ चालणार की ‘कमळ’ फुलणार, कार्यकर्त्यांमधील ‘धाकधूक’ वाढली

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन तगड्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे राहूल कलाटे यांच्यामध्ये लढत होत आहे. चिंचवडमध्ये जगतापांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. तर चिंचवडमध्ये परिवर्तन होणार असल्याचा विश्वास कलाटे यांच्या समर्थकांना आहे. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीमध्ये कलाटेंची बॅट तळपणार की पुन्हा कमळ फुलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये हॅटट्रीक साधण्याच्या तयारीत असलेल्या जगताप यांना राहुल कलाटे यांनी आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी दबदबा असला तरी राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने या ठिकाणची लढत चुरशीची बनली आहे. राष्ट्रवादीने या ठिकाणी आपला उमेदवार न देण्याची खेळी केली. त्यामुळे लक्षवेधी झालेल्या लढतीमध्ये भाजप उमेदवाराची हॅटट्रिक चुकविण्याची संधी यानिमित्ताने चालून आली आहे. एवढेच नाही, तर भाजप उमेदवाराचे मंत्री बनवण्याचे मसुबेही त्यातून उधळे जाणार आहे. जर हॅटट्रीक झाली तर मंत्री बनणार अशी अपेक्षा जगताप यांना आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुका सर्वपक्षांनी स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यातच लढत झाली होती. मोदी लाटेत देखील कलाटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 63 हजार 489 मते घेत ‘टफ फाईट’ दिली होती. यावेळी शिवसेना-भाजपची महायुती आहे. पण, राहुल कलाटे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा जगताप आणि कलाटे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com

You might also like