चिंतामणी दर्शनाची भाविकांना पहावी लागणार वाट

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत, केंद्र सरकारने काही अटीवर देशांतर्गत मंदिर व मस्जिद उघडण्याची परवानगी दिली असली तरीही राज्यातील सर्व धार्मिक स्थळे या महिना अखेर बंदच आहेत, अष्टविनायकापैकी एक थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर आज संकष्टी चतुर्थीस उघडले नाही.

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र येथे श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी प्रत्येक चतुर्थीस भाविकांची मोठी गर्दी असते परंतु देशात लाॅकडाऊन केल्यानंतर गेल्या अडीच महिन्यापासून येथील गणपती मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आज सकाळी देवालयाचे पुजारी किर्तीराज आगलावे यांनी महापुजा केली तर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली.देवालयातील दैनंदिन कार्यक्रम नियमितपणे चालू आहेत. तर चंद्रोदयानंतर आगलावे बंधू देऊळवाड्यात श्री ची पालखी छबिना काढतात.

कोरोना विषाणूचा फैलाव पूर्व हवेलीतील बहुतेक गावात झाला असला तरीही थेऊर येथील ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनामुळे तसेच आरोग्य विभाग आशा सेविका महसूल विभाग यांची तत्परता यामुळे आजपर्यंत येथे रुग्ण सापडला नाही. विशेष म्हणजे गावातील दक्ष नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे. गावच्या सरपंच संगीता गोविंद तारु, उपसरपंच नितीन कुंजीर, माजी उपसरपंच आप्पासाहेब काळे, विलास कुंजीर, शहाजी जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी विशेष लक्ष घातले.