टार्गेट पूर्ण न केल्याने पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांवर नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगले नाराज झाले आहेत. कारण त्यांनी या निवडणुकीसाठी त्यांना जे टार्गेट दिले होते. ते त्यांना पूर्ण करणे शक्य झाले नाही. (बुरो न मानो आज १ एप्रिल आहे)

शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यामुळे अध्यक्षांना सर्व अपमान गिळून शेवटी मातोश्रीची पायधुळ झाडावी लागली. हा अपमान त्यांनी सहन केला. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असल्याने यंदा महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी होण्याची शक्यता असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून येऊ लागले होते. त्यामुळे निवडणुकीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाही मोडून काढून त्यांना आपल्याकडे खेचून आणण्याची कामगिरी सोपविली होती. जे निवडून येतील असे किमान १० उमेदवार तरी आयात करण्याचा आदेश त्यांना दिला होता. पण, खूप प्रयत्न करुनही केवळ ६ जणांना त्यांना पक्षात आणण्यात यश आले. त्यात म्हाडामध्ये खूपच घोळ घातला गेला. रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेतले. पण, त्यांना उमेदवारी देता आली नाही. त्यामुळे आता तेथे भाजपला धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी भाजपला बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्याबाबत शिवसेनेचा विरोध कमी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले नाही. त्यामुळे राज्यातील भाजपकडून आता केवळ या एका जागेवरील उमेदवार जाहीर करण्याचे राहिले आहे. मागील विधानसभेत त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना भाजपकडे वळविले. त्याप्रमाणे यंदा अशा तुल्यबळ नेत्यांना भाजपात आणण्यात यश मिळाले नाही.

मोदींनी पाच वर्षात केलेला विकास पाहूनही मुख्यमंत्र्यांना आता ही कामगिरी जमू शकलेली नाही़ तर, पुढील विधानसभेसाठी ते किती जणांना आणू शकतील अशी चिंता आतापासूनच लागली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांवर नाराज झाल्याची चर्चा दिल्ली दरबारी रंगू लागली आहे. (बुरो न मानो आज १ एप्रिल आहे)