‘वंचित’ फॅक्टरमुळे राज्यात काँग्रेसच्या मूठभर नेत्यांच्या अस्तित्वालाच ‘ग्रहण’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा निवडणुकीत ‘ना घरका ना घटका’ अशी अवस्था झालेल्या काँग्रेसची महाराष्ट्रात आता पुढील वाटचाल बिकट होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चबांधणी करणाऱ्या काँग्रेसची निवडणुकीआधीच कोंडी झाली आहे. एकसंध नसल्यास काय घडते आणि काय अनुभवावे लागते याचा कटू अनुभव प्रदेश काँग्रेसला आता वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ४० जागांच्या प्रस्तावामुळे घ्यावा लागत आहे. केवळ ४० जागा काँग्रेसला देऊन आघाडी करण्याचा प्रस्ताव ‘वंचित’ ने दिल्याने सत्तेच्या सारीपाटात काँग्रेससमोर आता अस्तित्वाचा प्रश्नच उभा ठाकला असून मूठभर नेत्यांचीच आता खरी कसोटी ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना सत्ता येण्याआधीच आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले . परिणामी त्यातून मनभेदाचे राजकारण पेटले. त्यामुळेच लोकसभेच्या वेळी नांदेडच्या प्रचारसभेकडे राज्यातील दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात होती आणि आता ती या पराभवाला कारणीभूत ठरवली जात आहे. त्यातही यापूर्वी काढलेल्या जनसंघर्ष यात्रेवरही पक्षांतर्गत टीकाटिपण्णी होत आहे आणि त्यातील वास्तव काय होते, हेही आता मांडले जात आहे. ते म्हणजे मोदी लाटेत होत्याचं नव्हतं झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली.

विशेषतः महाराष्ट्रात तर काँग्रेसची केविलवाणी अवस्था आहे. जे नेतृत्व करीत आहेत त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत विरोधाची भावना आहे ; पण काय स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी जो-तो स्वतःपुरते पाहत आहे परिणामी जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

जनसंघर्ष यात्रेद्वारे जनमानसात गेलेली पत पुन्हा प्राप्त करण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागला का ? हा प्रश्न आजही उपस्थित केला जात आहे. या मूठभर नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अस्तित्व गमवून बसण्याची वेळ आता ओढवली आहे. हेच आता ‘वंचित’ने दिलेल्या ४० जागांचा प्रस्ताव आणि त्यासाठी दहा दिवसांची मुदत यामुळे अधोरेखित झाले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीला काडीचीही किंमत न देता भाजपाची बी टीम असा टाहो फोडणाऱ्यांना आता वंचित आघाडीचे महत्व कळले आहे. लोकसभा निवडणुकीत ४८ जागांवर उमेदवार उभे करून ‘वंचित’च्या मतांच्या फुटीचा डाव कुणाला फायद्याचा ठरतो यापेक्षा कुणाला मारक ठरतो हेच दिसून आले. विशेष म्हणजे ‘वंचित’मुळे मतांचे गणित फिस्कटल्याने अनेक दिग्गज आता जमिनीवर आले आहेत. किंबहुना त्यांना आता अस्तित्वाची लढाई काय असते, याचा अनुभव घ्यावा लागत आहे. असे काँग्रेसमधील अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी कधीच नवी फळी काँग्रेसमध्ये तयार होऊ दिली नाही आणि केवळ घरातील आणि सग्यासोयऱ्यांपुरतीच काँग्रेस ठेवली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत खरी कसोटी या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेल्या मूठभर नेत्यांचीच असणार आहे. पुन्हा मोदी सरकार आले आहे.

अस्तित्व आणि भवितव्य टिकविण्यासाठी अनेक राजकीय व्यक्तींनी भाजपमध्ये यापूर्वीच प्रवेश केलेला आहे. त्यात अनेक पक्ष आहेत. मुख्यत्वे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातील अनेक जण भाजपवासीय झाल्याने साहजिकच त्यांना मानणारे समर्थक आणि स्थानिक प्राबल्य हेही भाजपसाठी जमेचे ठरले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसला मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धक्का बसू शकतो. एकीकडे राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या लोकसभा निवडणुकीतुन ‘वंचित’ सारखा सक्षम पर्याय निर्माण झाल्याने मनसेचे महत्वही तसे आता वाढणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास ‘वंचित’ ने जातीय समीकरणाना लक्ष्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे यापूर्वी मनसेचा असलेला बोलबाला पाहता, यंदा विधानसभा निवडणुकीला ‘वंचित’ची चलती असणार हेही निश्चित आहे. त्यामागे लोकसभा निवडणुकीतील मतांची विभागणी आहे. मनसेला नाकारणाऱ्या आणि वंचितकडे ‘हात’ पसरणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीसाठी २४८ जागा आम्ही लढतो, तुमच्यासाठी ४० जागा सोडतो हा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आणि त्यासाठी दहा दिवसांची दिलेली मुदत पाहता महाराष्ट्रातील मूठभर नेत्यांचीच आता खरी कसोटी आहे. पक्षाच्या अस्तित्वापेक्षा या नेत्यांच्या अस्तित्वालाच आता ‘ ग्रहण’ लागले आहे.

आरोग्यविषयक बातम्या

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात
दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा
लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा
अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे