‘या’ काँग्रेस नेत्याचा भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयात अजब दावा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार कार्यालयात काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्षपदावरून डच्चू दिलेले अण्णासाहेब शेलार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर अजून मीच असल्याचा हास्यास्पद दावा केला आहे. तीन दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्षपदी करण ससाणे यांची नियुक्ती केल्याचे प्रसिद्धीपत्रक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केले आहे. असे असतानाही शेलार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर असल्याचा दावा भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात केला आहे.

शेलार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘पक्षाने कोणतेही कारण नसताना दुसऱ्या व्यक्तीची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र मला पदावरून दूर केले, बाबतची कोणतेही पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे मीच पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांच्या बाजूने आहे. डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला, त्यावेळी काही कार्यकर्ते भाजप प्रवेशासाठी मुंबईत गेले असतील. मात्र, मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस पक्षातच आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही, असा निर्णय घेतलेला आहे.’

शेलार हे काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष होते. पक्षाध्यक्ष गांधी यांच्या मान्यतेने ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती झालेली असताना शेलार यांनी काँग्रेसचे परंपरागत मुख्य विरोधक असलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून केलेले वक्तव्य आता चांगलेच हास्याचा विषय ठरले आहे. शेलार यांचे वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात रंगतदार चर्चा सुरू झाली आहे.

..हे शेलारांचे अतिच !

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी असल्याचा दावा करणारे शेलार हे आघाडीच्या उमेदवाराऐवजी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. संपूर्ण देशभरात पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवित आहे, त्या पक्षाच्या प्रचार कार्यालयातून जिल्हाध्यक्षपदी असल्याचा शेलार यांनी केलेला दावा म्हणजे अतीच झाले, असा आरोप काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.