४२ वर्षांनंतर ‘अमेठी’त गांधी घराण्याचा दुसऱ्यांदा ‘पराभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील अमेठी हा मतदारसंघ गेल्या चार दशकापासून गांधी घराण्याचा वारसा सांगत आला आहे. संजय गांधी, राजीव गांधी व त्यानंतर आता राहुल गांधी यांनी या मतदारसंघांचे नेतृत्व केले आहे. १९७७ च्या जनता लाटेत अमेठीमधून संजय गांधी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ४२ वर्षानंतर आता २०१९ मध्ये राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा तब्बल ५५ हजार १२० मतांनी पराभव केला.

स्मृती इराणी यांना ४ लाख ६८ हजार ५१४ मते मिळाली तर राहुल गांधी यांना ४ लाख १३ हजार मते मिळाली. समाजवादी -सपा ने या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. त्यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला होता. याशिवाय अखिलेश यादव व मायावती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना मते देण्याचे आवाहन केले होते. नाहीतर राहुल गांधी यांचा याहूनही मोठा पराभव झाला असता.

राष्ट्रीय राजकारण करताना केवळ भावनिक आवाहनावर मतदारांना गृहीत धरता येत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक मतदार संघ जोपासावा लागतो. तेथे नियमित संपर्क ठेवावा लागतो. राष्ट्रीय नेतृत्व करणारा नेता आपल्या मतदारसंघाचे नेतृत्व करतोय त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे, अशी भावना मतदारांमध्ये असते. त्याकडे राहुल गांधी यांचे दुर्लक्ष झाले. त्याचवेळी पाच वर्षापूर्वी पराभव झाल्यानंतरही स्मृती इराणी यांनी सातत्याने अमेठीशी संपर्क ठेवला. पुढील वेळी येथून विजय मिळवायचाच या निश्चयाने त्यांनी अनेक योजना मतदारसंघात राबविल्या. त्याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसून येत आहे.

त्याचवेळी शेजारील रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी यांनी तब्बल १ लाख ६७ हजार १५८ मतांनी विजय मिळविला. सोनिया गांधी यांना ५ लाख ३४ हजार ९१८ मते मिळाली तर भाजपाच्या दिनेश प्रताप सिंग यांना ३ लाख ६७ हजार ७४० मते मिळाली. शेजारी शेजारी असलेल्या मतदारसंघात मात्र दोन परस्परविरोधी वातावरण या निमित्ताने दिसून आले.