काँग्रेसचा बडा नेता कॅन्टोन्मेंटसाठी ‘वर्षा’ वर ; मुख्यमंत्र्यांकडून मात्र ‘रेड सिग्नल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील पानीपतामुळे धास्तावलेले राज्यातील काँग्रेसजन विधानसभा निवडणुकीसाठी आश्रय शोधू लागले आहेत. पुण्यात आठही मतदारसंघात भाजपचेच आमदार असल्याने काँग्रेसच्या आयारामांना तशी संधी कमीच आहे. परंतू नुकतेच कॅन्टोंन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांच्याकडील राज्यमंत्री पद गेल्याने लोकसभेप्रमाणेच कॅन्टोंन्मेंटमध्ये बदल होईल या आशेने काँग्रेसच्या शहरातील एका नेत्याच्या चिरंजीवांनी नुकतेच भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने वर्षा बंगल्यावर जाउन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतू संबधित चिरंजीवांनी महापालिका निवडणुकीच्यावेळी प्रवेशाची ऑङ्गर नाकारल्याने वर्षावरून त्यांना सध्यातरी लाल सिग्नल मिळाला आहे.

मागील लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाले आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तीच परंपरा कायम राहील्याने शहर काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे. एकंदरच देशातील आणि राज्यातील जनतेनेही नाकारल्याने अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजप, शिवसेनेमध्ये प्रवेश करत असून अनेकजण रांगेत आहेत. येत्या तीन- चार महिन्यांत विधानसभा निवडणुक होत असल्याने पक्षप्रवेशाच्या भेटीगाठीसाठी सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ङ्गेर्‍या सुरू झाल्या आहेत.
नुकतेच झालेल्या मंत्रीमंडळातील बदलानंतर आशेचा किरण दिसलेल्या काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याच्या चिरंजीवाने वर्षा बंगल्यावर हजेरी लावली होती. याला कारणही तसेच होते. मंत्री मंडळातील ङ्गेरबदलामध्ये कॅन्टोंन्मेंट मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांच्याकडील समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद काढून घेण्यात आले. विशेष असे की लोकसभा निवडणुकीमध्ये उर्वरीत सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीष बापट यांना भरघोस आघाडी मिळाली होती. परंतू एकमेव कसबा मतदारसंघातून जेमतेम १३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. यामुळेच कांबळे यांच्याकडील मंत्रीपद काढून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुणे लोकसभेप्रमाणेच कॅन्टोंन्मेंट मतदारसंघात बदल होईल, या शक्यतेने काँग्रेसच्या त्या नेत्याच्या चिरंजीवाने वडीलांची मैत्री असलेल्या भाजपच्या एका नेत्याच्या सहकार्याने कॅन्टोंन्मेंट मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले. विशेष असे की २०१७ मध्ये भाजपनेच या चिरंजीवांनाच भाजपमध्ये येण्याची ऑङ्गर दिली होती. त्यावेळी ही ऑङ्गर नाकारल्यामुळे वर्षावरून त्यांना रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे.

कॅन्टोंन्मेट मतदारसंघामध्ये दिलीप कांबळे यांच्यासोबतच त्यांचे बंधू व विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे, माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे, माजी शिक्षण मंडळ सदस्य किरण कांबळे यांच्यासह अन्य काहीजण इच्छुक आहेत. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि रिपाइं युती असून मित्र पक्षांकडूनही या जागेची मागणी होत आहे. कॅन्टोंन्मेंट मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून शहरातील कॉस्मॉपॉलिटन मतदारसंघ म्हणून कॅन्टोंन्मेंटची ओळख आहे. प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करूनच भाजप श्रेष्ठींकडून या मतदारसंघाबाबत निर्णय घेतला जाईल, याबाबत शंका नाही. मात्र, त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा प्रमुख नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तीच भाजपमध्ये येण्यास तयार झाल्याने भाजपने आर्धी लढाई आताच जिंकल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त