विधानसभा : आता काॅंग्रेस – राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये ‘काडीमोड’ ?

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करणाऱ्या काँग्रेसने आता राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. आघाडी धर्म पाळण्यापेक्षा राष्ट्रवादीने सोईचे गणित जुळविण्यासाठी काँग्रेसचा आधार घेतला मात्र काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाच्या खाईत लोटले. भाजपकडेच राष्ट्रवादीचा कल जास्त होता असा सूर आता काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आळवला आहे. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत ‘काडीमोड’ होण्याची चिन्हे आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ ९० दिवस राहिले आहेत, यापार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची बैठक पार पडली. त्यात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीवर तोंडसुख घेताना राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. राज्यात काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादीच कारणीभूत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यात मतांचे समीकरण मांडताना दलित आणि अल्पसंख्यांकाची मते वंचित बहुजन आघाडीकडे गेल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. बैठकीत मुख्यत्वे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर भाष्य करण्यात आले.

राष्ट्रवादीने केवळ त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसची मदत घेतली. मात्र काँग्रेसच्या मतदारसंघात त्यांनी अप्रत्यक्ष अलिप्तवादाची भूमिका घेतल्याने त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह यावेळी विविध नेत्यांनी लावून धरताना आता अस्तित्वासाठी लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला बरोबर घ्यावे ; पण राष्ट्रवादी कदापि नको असा रोखठोक पवित्रा अनेक नेत्यांनी, जिल्हाध्यक्षांनी घेतला. त्यामुळे येत्या काही दिवसात आघाडीत बेबनाव आहे का ? हे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने राज्यातील विधानसभा जागांचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे श्रेष्ठी कोणता फैसला करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रदेश काँग्रेसच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.