काॅंग्रेसचे निष्ठावंत मोहन जोशी यांना उमेदवारीचे ‘फळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षात निष्ठेला कधीना कधी फळ मिळतेच. उशीर होईल पण तुमच्यावर अन्याय होणार नाही, असे काँग्रेसचे जुने जाणते निष्ठावंत नेहमीच सांगत असतात. पुणे लोकसभा निवडणुकीत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. काँग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार मोहन जोशी यांना पक्षाने सोमवारी रात्री उमेदवारी जाहीर केली. तेव्हा सर्वांच्या तोंडातून नकळत एकच उद्गार आला तो म्हणजे निष्ठावंताला मिळाले फळ.

संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांंनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. जवळपास सर्वांनीच त्यांची उमेदवारी गृहीत धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे मराठा तितुका मेळवावा चा प्रयोग पुन्हा एकदा करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यात रविवारी लाल महालात झालेल्या बैठकीत प्रवीण गायकवाड यांनी मुख्यमंत्री कोण, पालकमंत्री कोण, महापौर कोण याचा विचार करा, असे सांगत आपला प्रचाराचा रोख कसा असणार हे स्पष्ट केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याला अनेकांनी विरोध करीत निषेध केला. राज्यात मनसे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दर्शवित असली तरी गायकवाड यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर मात्र काँग्रेसने आपला निष्ठावंत कार्यकर्ताच बरा असा विचार करुन मोहन जोशी यांची उमेदवारी जाहीर केली.
मोहन जोशी हे गेली ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता त्यांनी केलेल्या कामामुळे सुरेश कलमाडी यांनी त्यांच्यातील गुण हेरुन त्यांची शहराध्यक्षपदी निवड केली.

सुमारे ६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी शहराध्यक्ष म्हणून काम केले. सुरेश कलमाडी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची गणना त्यावेळी केली जात होती. निवडणुकीत तसेच महापालिकेतील पदांचे वाटप यामध्ये त्यांचे मत महत्वाचे ठरत होते. मात्र, सुरेश कलमाडी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मोहन जोशी हे त्यांच्याबरोबर जाणार हे जवळपास सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र, आपण काँग्रेस कधीही सोडणार नाही, असे सांगत सुरेश कलमाडी यांच्या निर्णयाला पुण्यातून सर्वप्रथम विरोध करण्याचे काम मोहन जोशी यांनी दाखविले होते.

काँग्रेसमधील बहुतांश नगरसेवक कलमाडी यांच्या पुणे विकास आघाडीत सहभागी झाले होते. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांच्या पुढे कोणाला उभे करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आजच्या सारखा उमेदवारीचा प्रश्न रेंगाळला होता. तेव्हा शहराध्यक्ष असलेल्या मोहन जोशी यांनी काँग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी मतदान उमेदवाराला नाही तर पक्षाला करा असा सांगत प्रचारफेरी काढण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर विठ्ठल तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या पाठीमागे पक्षाची सर्व यंत्रणा उभी करुन त्यांना निवडुन आणण्यात त्यांचा शहराध्यक्ष म्हणून मोठा वाटा होता. त्यानंतर विधान परिषदेचे तिकीट देण्याची वेळ आली. तेव्हा प्रथम त्यांच्या नावाचा विचार झाला. पण ऐनवेळी त्यांना वगळण्यात आले. तरीही त्यांनी राग न मानता पक्षाचे काम सुरु ठेवले. त्यामुळे दोन वर्षांनी पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुका लागल्य. तेव्हा त्यांची निवड करण्यात आली. तेव्हाही कार्यकर्त्यांनी निष्ठेला मिळाले आमदारकीचे फळ मिळाले.

त्यांनी गुजरातमध्ये यापूर्वी निरीक्षक म्हणून काम केले आहे. या शिवाय विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे निरीक्षक म्हणून काम केले आहे. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली़ त्यावेळी काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांच्या जनसंपर्काची चुणूक दिसली होती. वाजपेयी यांच्या करिश्मामुळे प्रदीप रावत हे निवडुन आले होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विठ्ठल तुपे यांना मागे टाकून मोहन जोशी यांनी दुसऱ्या क्रमांकाची २ लाखांहून अधिक मते घेऊन सर्वांना धक्का दिला होता. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी केली आहे. तिला आता वेग येणार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहन जोशी यांनी केलेले जाहीर आवाहन

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने, पुणे लोकसभा मतदार संघासाठी, सांगोपांग विचार करून माझी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली, त्याबद्दल मी कॉंग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो.

माझ्या मते, लोकसभेची ही निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने जीवन-मरण्याची आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने मागील पाच वर्षात ज्या एककल्ली, असंवेदनशील आणि एकाधिकारशाही कारभार केला, त्यामुळे लोकशाही, संविधान, मूलभूत स्वातंत्र्य, या सारख्या शाश्वत मूल्यांच्या रक्षणाची जबाबदारी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्षांच्या आघाडीवर आली आहे. या विचारांच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठीच्या लढाईत, कॉंग्रेस पक्षाने माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोंपवली आहे.

मागील ४० वर्षांहून अधिक काळ एक कामगार, श्रमिक पत्रकार, युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जे कार्य केले आहे, त्याचा आणि कॉंग्रेस पक्षाच्या आणि आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच सन्मान झाला आहे, अशी माझी विनम्र भावना आहे.

आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माज्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कायार्नुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा मला आत्मविश्वास वाटतो.

प्रचंड आर्थिक ताकद, सत्तेची मगरूरी आणि मागील पाच वषार्तील गैरकारभाराला कंटाळलेले मतदार, मोदी सरकारच्या दिखाऊ, खोट्या आणि प्रचारकी कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील, याची मला खात्री वाटते. माझ्या उमेदवारीमुळे, शहरातील सर्व वयोगटातील आणि विशेषत: युवक-युवतींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

समाजातील विविध धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांतातील लोकांना बरोबर घेऊन, विकासाच्या वाटेवर चालण्याची क्षमता फक्त कॉंग्रेस पक्षातच आहे. या कार्यात मला लोकनेते आदरणीय शरदराव पवार, माननीय अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते; तसेच रिपब्लिकन पक्षासारखे मित्रपक्षांच्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्यामुळेच, देशाचे भवितव्य ठरविणा-या निवडणुकीच्या संग्रामात मला उत्तम यश मिळेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. या सर्वांच्या बळावर मी मोदी सरकारच्या गैरकारभाराची लक्तरे मतदारांपुढे प्रभावीपणे मांडत असतानाच, पुण्याच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या समग्र विकासाचा शहर पातळीवरील संयुक्त जाहीरनामा देखील मांडणार आहे.

पुणेकरांच्या सादेला प्रतिसाद देणारा मी कार्यकर्ता असून, या निमित्ताने शहराच्या कानाकोप-यात पोहोचून लोकांशी संवाद साधण्याची आम्ही पराकाष्ठा करून, विजयश्री खेचून आणू, असा आम्हा सर्वांनाच विश्वास वाटतो. असे मोहन जोशी म्हणाले.