काँग्रेसला आता केवळ २००४ प्रमाणे ‘त्या’ चमत्काराची अपेक्षा

ऑस्ट्रेलियातील सर्व एक्झिट पोल झाले फेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सातव्या टप्प्यातील मतदानानंतर आलेल्या बहुतांशी एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला पुन्हा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एनडीए सत्ता देताना या सर्वच एक्झिट पोलने भाजपाला भरभरुन जागा दिल्या आहे. त्यामुळे अनेकांना हे एक्झिट पोल अविश्वसनीय वाटत आहे. दुसरीकडे भारताबरोबरच ऑस्ट्रेलियामध्येही निवडणुका झाल्या. त्यात सर्वच एक्झिट पोलने सत्ताधारी पक्ष पराभूत होऊन विरोधी लेबर पक्षाला सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण सर्व एक्झिट पोलला धुळ चारत सत्तारुढ पक्षाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी विजय मिळवित पुन्हा सत्ता काबीज केली आहे. अशाच काहीशा चमत्काराची काँग्रेसला आता अपेक्षा आहे.

दुसरीकडे वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार असताना २००४ साली असाच प्रकारे सर्व एक्झिट पोलने एनडीएचे सरकार सत्तेवर येणार असे एक्झिट पोल जाहीर केले होते. भाजपाने शायनिंग इंडिया अशी मोठी जाहिरात मोहीम त्यावेळी केली होती. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाम असा सुवर्ण चतुष्कोन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करुन त्याचे धडाक्यात काम सुरु केले होते. प्रमोद महाजन यांच्या कल्पनेतून शायनिंग इंडिया ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळच्या सर्व एक्झिट पोलने भाजपा आघाडीला २५० ते २९० पर्यंत जागा दिल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेस आघाडीला १६९ ते २०५ जागा दर्शविल्या होत्या. प्रत्यक्ष निकाल हाती लागले तेव्हा भाजपा आघाडी केवळ १८९ पर्यंत पोहचू शकली तर कॉंग्रेस आघाडीला २२२ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पुढे १० वर्षे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर होते.

त्याप्रमाणे २००९ मध्येही सर्वांनी काँग्रेस व भाजपा आघाडीला जवळपास सारख्या जागा दिल्या होता. पण, काँग्रेस आघाडीने सर्वांचे अंदाजांना धुळ चारत तब्बल २६२ जागा मिळविल्या होत्या. त्याचवेळी यंदा जे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. त्यात प्रचंड तफावत आहे. एनडीएला २४२ ते ३६५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजात १२३ जागांचा असलेला फरक भ्रम निर्माण करीत आहे. तसेच या सर्व्हेच्या वैज्ञानिकतेबाबतही सवाल केले जात आहेत.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपच्या बम्पर विजयाचा अंदाज मांडला होता; पण झाले उलटेच. चाणक्यने भाजपला १५५ जागा आणि निल्सनने १०० जागा मिळतील, असे सांगितले होते; पण निकाल एकदम वेगळे लागले.
आता या एक्झिट पोलचे तंत्र विकसित झाले आहे. त्यामुळे आता जाहीर झालेले एक्झिट पोल हे निकालाच्या जवळपास जातील असा दावा अनेक जण करीत आहेत. मात्र, भारताबरोबरच ऑस्ट्रेलियात झालेल्या निवडणुक निकालांनी एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे पलटून टाकले.

ऑस्ट्रेलियात यंदा जनता विरोधकांना संधी देणार असल्याचे दावे अत्यंत ठामपणे केले जात होते. ऑस्ट्रेलियामध्ये दर तीन वर्षांनी निवडणूक होते. मात्र, राजकीय स्पर्धेमुळे येथे २००७ पासून एकाही पंतप्रधानाला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. गेल्या दहा महिन्यात स्कॉट मॉरिसन यांनी दाखविलेल्या धडाडी दाखविली. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला आहे. ऑस्ट्रेलियातील एक्झिट पोल आणि २००४ मधील चमत्कार याप्रमाणे चमत्कार घडावा, या भरवशावर आता काँग्रेस राहिली आहे.