काँग्रेस आमदारांमध्ये पडू शकते ‘फुट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी जी वेळ दिली होती. ती संपली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र मिळविण्यात यश न आल्याने त्यांनी अधिक वेळ मागितली आहे. गेले काही दिवस केवळ चर्चाचे दळण दळत राहून काँग्रेस भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधी गमावणार का अशी आता चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जवळपास सर्व आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असतानाही कॉंग्रेसने अखेरपर्यंत निर्णय न घेतल्याने आता कदाचित काँग्रेसमध्ये फुट पडू शकते. मात्र, ती प्रत्यक्षात येण्यासाठी काँग्रेसचे आमदार हे जयपूरला असल्याने अडचणी होऊ शकते. राष्ट्रपती राजवट म्हणजे एकप्रकारे भाजपाची सत्ता असल्याने काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा न देता ही संधी गमावणार का ? अशी विचारणा होऊ लागली आहे.

भाजपाने गेल्या ५ वर्षात सत्तेवर असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व पदाधिकाऱ्यांना भरपूर त्रास दिला. त्यामुळे यापूढेही जर भाजपा सत्तेवर आली तर पक्षाची अवस्था आणखी केविलवाणी होऊ शकते, हे राज्यातील जमिनीवर असलेले नेते आणि आमदारांना आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधी आली असताना ती साधावी, असे आमदारांना वाटत आहे. काँग्रेस आमदारांची ही इच्छा काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसचे नेत्यांना सांगितले गेले होते. पण, ती पोहचविण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आले नाही.

काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी सर्वात मोठा पक्ष असताना चर्चा चर्वणात वेळ घालवून गोवा व अन्य राज्यातील सत्ता गमावली होती. त्यापासून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, श्रेष्ठी काहीही शिकले नाही असे दिसून येते. कोणताही निर्णय न घेता आमदारांच्या इच्छेचा अवमान करुन स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला, अशी परिस्थिती यापुढे काँग्रेसवर येऊ शकते. काँग्रेस पक्ष इतका द्विधा मनस्थितीत आहे की, त्यांनी अजूनपर्यंत विधीमंडळ पक्षाचा नेताही निवडला नाही. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जरी घेतला तरी राज्यपालाकडे नेता नाही तर पक्षाला पत्र द्यावे लागणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना फोन केला तेव्हा शरद पवार यांनी आम्ही अजूनही पाठिंब्याचे पत्र दिले नसल्याचे सांगितले. त्यानंतर उद्या शरद पवार यांच्याशी बोलणी करुन मगच निर्णय घेण्याचे ठरवून दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक संपली असे सांगितले जाते.

राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने स्पष्ट पाठिंबा न दिल्याने महाशिव आघाडी अजून प्रत्यक्षात आली नसली तरी ती पुढे होऊ शकते.

शिवसेना पाठिंबा मिळवू न शकल्याने आज तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेले नाही.
काँग्रेसने जर पाठिंबा दिला नाही तर राज्यात राष्टपती राजवट लागू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. काँग्रेस आमदारांना आतापर्यंत जयपूरला ठेवले असले तरी विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी त्यांना मुंबईला आणावे लागेल.

काँग्रेसचे आज जे काही आमदार निवडून आले आहेत. ते त्यांच्या स्वत:च्या जोरावर निवडून आले आहेत. त्यात केंद्र अथवा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा काहीही हात नाही. त्यामुळे सध्या ते आपले मत आक्रमकपणे मांडत आहेत. जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्यांना काम करणे अवघड होणार आहे. जर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर काँग्रेसमधील आमदारांमध्ये फुट पडू शकते, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Visit : Policenama.com