शेतकरी कर्जमाफीची लिंक ‘कँडीक्रश’वर, सहकार आयुक्तांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र ही शेतकरी कर्जमाफीची योजना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेली बेवसाइटची लिंक ही कँडीक्रशवर जात असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. याचा ठपका प्रभारी सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्यावर ठेवत त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या बेवसाइटची लिंक कँडिक्रशवर जात असल्याचे आढळून येताच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्याकडे यापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कवडे हे पूर्णवेळ या पदाचा कारभार पाहणार आहेत. अशी चुकीची लिंक ही नजरचुकीने दिली जाऊ शकते किंवा सरकारला बदनाम करण्याचा कट यामागे असू शकतो अशी शक्यता सोनी यांच्या निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2020 या योजनेसाठी सहकार आयुक्तांना दोन पत्रे तयार केली होती. या पत्रामध्ये त्यांनी या योजनेची लिंक कृषी खात्याला दिली होती. परंतु ही लिंक ओपन केल्यास कँडिक्रशवर जात होती. ही लिंक चुकीची असल्याचे आढळून आल्याने कृषी खात्याने याबाबत सरकारला कळवले होते.

महाविकासआघाडीच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार आयुक्त सोनी यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक होते. तसेच ही लिंक कृषी खात्याला पाठवताना त्याची खात्री करून घेणे आवश्यक होते. त्यांनी केलेली चूक ही अनावधानाने झाली नसून त्यांनी हेतूपुरस्सराने केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्यांच्या या चुकीमुळे योजनेची बदनामी झाली असून त्यामुळे सरकारला याचा खुलासा करण्याची वेळ आली. सहकार आयुक्तांनी त्यांचे कर्तव्य बजावताना कामात हलगर्जीपणा, दुर्लक्ष व बेजबाबदारपणा दाखवला आहे. याची चौकशी करणे गरजेचे असल्याने त्यांना 21 जानेवारीपासून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –