हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सपासप वार करून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गल्लीतल्या अरुंध रस्त्यावरून जात असताना दुचाकीचा हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने दोघांनी एका व्यक्तीवर सपासप वार करून खून केला. तर दोघांवर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास पूर्व मुंबईतील मोहन नगर बंजारा वस्ती येथे घडला आहे. या घटनेत आरोपी देखील जखमी झाले असून पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

मनोहर चावरिया (वय-५७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पुजा चावरिया (वय-३६) आणि दिपक चावरिया (वय-२९) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संदिप पारचा (वय-२८) आणि पालसिंग पारचा (वय-७०) यांच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संदिप आणि पालसिंग जखमी झाले आहेत. मनोज चावरिया (वय-३२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ आज सकाळी दुचाकीवरून कामावर जात होते. अरुंद गल्लीतून जाताना रस्त्याच्या मध्ये आरोपी संदिप पारचा व त्यांचे वडील पालसिंग पारचा हे उभे होते. त्यामुळे फिर्यादी यांनी दुचाकीचा हार्न वाजवला असता आरोपीला राग आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता आरोपी व त्यांच्या वडीलांनी संदीप व दिपकला धक्काबुक्की केली.

यावेळी फिर्यादीचे वडील मनोहर चावरिया व बहिण पुजा यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता संदिप पारचा याने घरातून चाकु आणुन मनोज यांचे वडील त्याचा भाऊ, बहिण यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत मनोहर चावरिया यांच्या डाव्या बाजूला बरगडी जवळ चाकु खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास टिळकनगर पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त