६ लाख रुपये आणि व्याज द्यावे म्हणून खाजगी सावकारासह ७ जनांकडून मारहाण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – व्याजाने घेतलेले सहा लाख रुपये आणि राहिलेले व्याज त्वरित द्यावेत म्हणून एकाला सात जनांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील केडगावजवळ घडली आहे. यवत पोलिसांनी खाजगी सावकारकी आणि मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संभाजी भागूजी बोत्रे वय 41 वर्षे रा. पारगाव ता. दौड जि. पुणे यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी धनंजय आनंदा गडदे. रा-बोरीपारधी ता. दौड जि पुणे. महेंद्र विलास सोडनवर रा. पिसेवस्ती केडगाव ता. दौड जि पुणे. ड्राइवर आप्पा पूणव आणि व्याजाने पैसे देणारा सावकार संदीप लिम्हण रा- पाषाण पुणे व इतर तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी संभाजी बोत्रे यांनी आर्थिक अडचणीमुळे यातील आरोप संदीप लिम्हण यांचेकडून सहा लाख रुपये हे रु ३% टक्के शेकडा मासिक व्याज दराने घेतले होते. त्याबदल्यात तारण म्हणून फिर्यादीची मालकीची पारगाव येथील जमीन गट नं – ४४९ मधील ७३ आर हि शेत जमीन खरेदीखताने लिहून दिलेली होती. सदर सहा लाख रु. प्रत्येक महिन्याचे १८००० रु. प्रमाणे मासिक व्याजापैकी यातील आरोपी धनंजय गडदे, महेंद्र सोडनवर यांचेकडे आठ महिन्याचे व्याजाचे पैसे एकूण १,४४००० रु. रोख रक्कम दिली व आरोपी संदीप लिम्हण यांचे शारदा सहकारी बँकेच्या खात्यामध्ये २०,००० असे दोनवेळा व तिसर्या वेळेस २१,५०० रु. असे एकूण ६१,५०० रु. व्याजाची रक्कम युको बँक पारगाव येथून ट्रान्सफर केली होती.

आत्तापर्यंत एकूण व्याजाची रक्कम दोन लाख पाच हजार पाचशे अशी व्याजाची रक्कम यातील आरोपी संदीप लिम्हण यांना दिलेली आहे. तरी देखील राहिलेल्या व्याजाची रक्कम व मुद्दल द्यावि या कारणाकरिता यातील आरोपींनी फिर्यादिस केडगाव चौफुला रोडवरील हॉटेल गारवा येथे बोलवून घेऊन पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ नं – ८०५५ व काळ्या रंगाचे कार मधून येऊन फिर्यादिस व्याजाचे पैसे आत्ताचे आता दे असे म्हणत शिवीगाळ व हाताने मारहाण केली. यातील आरोपींवर मारहाण, शिवीगाळ आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक देवकर करीत आहेत.