अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षासह तिघांना अटक ; २ गावठी पिस्तूल, ५ काडतुसे जप्त

अंडरवर्ल्ड डॉन गवळी सेनेच्या तालुका अध्यक्षासह तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कुख्यात गुंड, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षासह तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

चरण बाळासाहेब ठाकर (२६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (२८, रा. पांगरी, ता खेड) आणि राजू शिवलाल परदेशी (५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) या तिघांना अटक केली आहे.

इंद्रायणी हॉस्पिटलसमोर केळगाव रोड आळंदी येथे एक व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सावन राठोड, अमित गायकवाड, सचिन उगले, प्रवीण पाटील, विशाल भोईर, गणेश सावंत यांच्या पथकाने सापळा रचला.

इंद्रायणी हॉस्पिटलसमोर चरण आला असता त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत त्याला अटक केली. आळंदी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

चरण याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या ओळखीचा प्रदीप खांडगे यांच्याकडून पिस्तूल विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप खांडगे याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मध्यप्रदेश राज्यातून दोन पिस्तूल आणले आहेत. त्यातील एक पिस्तूल चरण याला विकले आहे. तर दुसरे पिस्तूल कुसगाव लोणावळा येथील त्याचा मित्र राजु परदेशी याला विकले आहे, अशी प्रदीप याने माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी राजु परदेशी याला देखील अटक केली. तिघांकडून एकूण दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला आहे. चरण ठाकर हा सराईत गुन्हेगार असून तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भारतीय सेनेचा मावळ तालुका अध्यक्ष आहे.