प्रवासी असल्याच्या बहाण्याने ओला कॅब चालकाला लुटणारा जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रवासी असल्याचा बहाणा करत ओला कार चालकाला धमकावून लुबाडल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चोरट्याच्या हातावरील गोंदणाच्या धाग्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कृष्णा भगवान गोरेकर (२०, नांदेड फाटा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर रमेश जाधव (२०, मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

जाधव हे ओला कॅब चालवितात. ते दोन दिवसांपुर्वी मध्यरात्री सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ थांबलेले होते. त्यावेळी गोरेकर व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी जाधव यांना धायरेश्वर मंदिराजवळ सोडण्यास सांगितले. त्यानंतर तेथे सोडण्यासाठी पैसे देण्याचे ठरले आणि जाधव त्यांना घेऊन धायरीत आले. त्यावेळी गोरेकर व त्याच्या साथीदाराने जाधव यांना चाकूचा धाक दाखवून खिशातील रोकड, मोबाईल असा २० हजारांचा मुद्देमाल लुबाडला. त्यानंतर ते पसार झाले. मातर् गोरेकर यांनी घाबरलेल्या अवस्थेत सिंहगड रोड पोलीस ठाणे गाठले.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा ओला चालक जाधव यांना गोरेकर आणि त्याचा साथीदार लुटल्यानंतर त्याचे वर्णन सांगितले होते. त्याच्या हातावर गोंदण असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन गोरेकर याला अटक केली. त्याच्यावर यापुर्वी गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिली