१४ जिल्हे, १० हजार गावे, ५२ शहरांना ‘फनी’ चक्रीवादळाचा बसणार तडाखा

दुपारी पुरीजवळ धडकणार

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशा राज्यातील १४ जिल्हे, १० हजार गावे, ५२ शहरांना फनी या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. गेल्या ४० वर्षातील सर्वात तीव्र असलेले हे फनी चक्रीवादळ शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जगन्नाथपूरी ते गोपाळगंज दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यावेळी ओडिशाच्या किनारपट्टीवर १५० किमी वेगाने वारे वाहत आहेत.

फनी चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी युद्ध स्तरावर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. काही लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. संकटाला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची ८१ पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशा, पं. बंगाल, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात जाणाऱ्या २२३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून भुवनेश्वर आणि कोलकत्ता विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ १७० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने ओडिशाला धडकणार आहे.

या बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ निर्माण झाले तेव्हा ते सुरुवातीला तामिळनाडु, आंध्र प्रदेशच्या दिशेने जात होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी अचानक त्याची दिशा बदलली व ते ओडिशाच्या दिशेने निघाले. सध्या ते पुरीपासून ६० किमी अंतरावर आहे.
चक्रीवादळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा परिणाम जवळपास ६ तास राहणार असून या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगवान वाऱ्यांमुळे झाडे, वीजेचे खांब कोसळणे, कमकुवत घरांची पडझड होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.