दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 10 मिनिटांनी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा भाद्रपद शुद्ध चतुर्थी, सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील परमपूजनीय विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे उदघाटन त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दुपारी १२ वाजून २० मिनिटांपर्यंत चालणार आहे. भाविकांनी दुपारी १२.३० नंतर श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

प्राणप्रतिष्ठेपूर्वी श्रीं ची आगमन मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मूख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून काढण्यात येईल. फुलांनी साकारलेले २१ नाग रथावर लावण्यात येतील. फुलांची सजावट सुभाष सरपाले करीत आहेत.

यंदाची सजावट कोणार्क सूर्यमंदिराची आहे. ही प्रतिकृती भाविकांसाठी आकर्षक ठरेल. मोतीया रंगाच्या लाखो दिव्यांनी मंदिर उजळून निघेल. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा रोषणाईसाठी वापरण्यात आली आहे. मंदिर आणि परिसरात २२५ झुंबरे लावण्यात येणार आहेत. मंदिराच्या सजावटीचे काम शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, विद्युत रोषणाई वाईकर बंधू आणि मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांची आहे, असे गोडसे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, बाळासाहेब परांजपे, माणिकदादा चव्हाण, प्रकाश चव्हाण, सुनिल रासने उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –