जेवणाच्या सुट्टीचा एक तास उलटूनही कर्मचारी ‘गैरहजर’, आयुक्तांनी दिले ‘कारवाई’चे आदेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पाच दिवसांचा आठवडा झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी दुपारी एक ते दोन या वेळात अर्धा तासाची जेवणाची सुट्टी घ्यावी असे सरकारचेच आदेश आहेत. असे असातानाही जेवणाच्या सुट्टीचा एक तास उलटून देखील बऱ्याच विभागात कर्मचारी नसल्याचं धुळे महानगर पालिकेच्या आयुक्तांनी आज (२ मार्च २०२०) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अचानक केलेल्या पाहणीत आढळून आलं.

सध्या घरपट्टी भरण्यासाठी नागरिक मालमत्ता विभागात चकरा मारत आहेत. मात्र या मालमत्ता विभागात कोणी “वाली” च नसल्याचं आयुक्तांच्या पाहणीत निदर्शनास आलं. वसुलीच्या नावाखाली गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा रिपोर्ट सादर करण्याचे, तसेच पाहणी दरम्यान गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहेत. आयुक्तांनी अचानक केलेल्या पाहणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.