भरधाव वाहनाच्या धडकेत दोन पादच्याऱ्यांचा मृत्यू

साक्री (धुळे) : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाण्याऱ्या पिकअप वाहनाची धडक रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना बसली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीवर पिंपळनेर कुटीर रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री दहा वाजता पिंपळनेर येथे घडला.
रणजीत दौलत सिंग राजपुत (वय-४८), रविंद्र चन्द्रसिंग राजपुत (वय-४५ दोघे रा. नाना चौक, पिंपळनेर) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्यांची नावे आहेत.

रणजीत आणि रविंद्र हे जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी पिंपळनेर-नवापुर मार्गावरील मानव केंद्राजवळ गेले होते. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या पिकअपने (एमएच 04 / ई बी 7768) रविंद्र चंद्रसिंग राजपुत यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत चालणारे रणजीत दौलतसिंग राजपुत हे गंभीर जखमी झाले. जवळच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना डॉक्टर विवेक नुक्ते यांनी रणजीत यांना मृत घोषीत केले. पिकअप वाहन चालक गर्दीचा फायदा घेत तेथुन पसार झाला. पिंपळनेर पोलीस अधिकारी यांनी पंचनामा करुन गाडी पोलीस ठाण्यात जप्त केली.

 

या रस्त्यावर पथदिव्यांचे प्रमाण कमी आहे तर जिथे गतीरोधक हवे तिथे गतीरोधकच नाही. याच कारणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. मृत रविंद्र राजपुत यांच्या पश्चात दोन भांवडे, आई, वडिल, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पोलीसांनी महिंद्रा पिकअप वाहन चालक विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.