उन्हाळ्यातील आदर्श आहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यात तर सूर्य आग ओकत आहे. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घरच्या घरी आदर्श आहार कसा असावा याच्या काही टिप्स

उन्हाळ्यातील आदर्श आहार
– रोजच्या आहारात दूध, घरचे ताजे लोणी व तूप यांचा समावेश असावा.
– मुख्य जेवणात तांदूळ, ज्वारी, नाचणी, गहू या धान्यांचा समावेश असावा.
– डाळी, कडधान्यांमध्ये मूग, तूर, मसूर, मटकी उत्तम.
– भाज्यांपैकी दुधी, कोहळा, पडवळ, घोसाळी, दोडकी, टिंडा, भेंडी, काकडी, बटाटा, पालक उन्हाळ्यामध्ये वापरण्यास चांगल्या होय.
– स्वयंपाक करताना जिरे, धणे, दालचिनी, तमालपत्र, हळद, कोकम, वेलची, आले वगैरे मसाले वापरणे चांगले. ओल्या नारळाचा वापर करणेही उत्तम.
– सुक्‍या मेव्यामधील मनुका, अंजीर, खारीक उत्तम. रात्रभर पाण्यात भिजविलेले बदाम खाणेही चांगले.
– तांदळाची खीर, रव्याची खीर, गव्हाचा शिरा, दुधी हलवा, नारायण शिरा, नारळाची बर्फी, कोहळ्याचा पेठा, साखर भात वगैरे पचण्यास हलके; पण ताकद
-देणारे गोड पदार्थ उन्हाळ्यात सेवन करण्यास चांगले होत.
– जेवणानंतर ताजे गोड ताक जिऱ्याची पूड टाकून घेणे हेसुद्धा हितावह आहे .
– प्यायचे पाणी जलसंतुलनासह उकळून गार करून घेतलेले असावे, त्यातच जर मोगऱ्याची ताजी फुले टाकून ठेवली, तर असे सुगंधी व शीतल पाणी तहान तर शमवतेच; पण तृप्तीचा अनुभव देण्यासही समर्थ असते.

अशा प्रकारे उन्हाळ्यात आहारयोजनेकडे नीट लक्ष दिले, तर उन्हाळ्याचा त्रास होणे तर दूरच; पण उन्हाळा कधी संपला हे समजणारही नाही.