भाजप खा. दिलीप गांधी बंडाच्या पावित्र्यात !

विखेंच्या पराभवासाठी व्यूहरचना : पुत्र सुवेंद्र गांधी उमेदवारीच्या तयारीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने नुकताच पक्ष प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने खा. दिलीप गांधी अस्वस्थ आहेत. ते बंडखोरीच्या पवित्र्यात असून, पुत्र सुवेंद्र गांधी यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे विखे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

खासदार गांधी हे माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार असतानाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुत्राच्या भाजप प्रवेशामुळे त्यांचा पत्ता कट करण्यात आला. भाजपाकडून डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खा. दिलीप गांधी व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. पक्षाच्या भूमिकेवर त्यांची नाराजी आहे. विखे यांच्यामुळेच आपली उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुजय यांना पराभूत करण्यासाठी खा. दिलीप गांधी यांनी राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. आज दुपारी एक वाजता टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात गांधी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबतची राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे गांधी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

डॉ. सुजय विखे, आ. संग्राम जगताप हे दोन्ही तगडे उमेदवार युवा असल्याने खा. गांधी यांच्याकडूनही त्यांचे पुत्र सुवेंद्र यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही याची पोस्टरबाजी सुरु झाली आहे. दुपारी एक वाजता होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.