राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे (चाकण) : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अटकपूर्व जामीनावर गुरुवारी (दि.१९) दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. आज यावर पुन्हा सुनावणी सुरु झाली. त्यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी फेटाळला आहे.

चाकण हिंसाचाराच्या घटने अगोदर काही दिवस हे कटकारस्थान करण्यासाठी एक बैठक झाली होती. या बैठकिला दिलीप मोहिते हजर असल्याचे साक्षीदरांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. मात्र, या साक्षीदारांची नावे आता उघड करता येणार नाहीत. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार आणि मोहिते यांच्या भाषणातील वक्तव्यानुसार या घटनेची पूर्वकल्पना होती, हे सिद्ध होत आहे. म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये असा युक्तीवाद सरकारी वकील अरुण ढमाले यांनी केला. सरकारी वकिलांचा युक्तीवादानंतर न्यायायाधिशांनी दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान, मोहिते यांचे वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी पोलिसांनी कटकारस्थानाचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी केले. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा छळ करण्याचा उद्देश आहे. म्हणून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Loading...
You might also like