अखेर अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे उपोषण सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी शेकडो ग्रामस्थांसह आमरण उपोषण चालू केले आहे. आज सकाळी जिल्हा परिषद आवारात हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा, नगर तालुक्यातील 35 गावांना लाभदायक ठरणारी साकळाई उपसा सिंचन योजना फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरती ठरविली आहे. या योजनेवर राजकारण करून अनेकांनी निवडणुका लढवल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून चित्रपट अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या योजनेबाबत दीपाली सय्यद यांना आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीअगोदर या योजनेचे काम चालू होईल, असे सांगितले होते. त्यामुळे सय्यद यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता. मात्र निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. सरकारकडून या योजनेबाबत वेगवेगळी विधाने आल्यानंतर पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी गेल्या दीड महिन्यापासून या योजने खाली येणाऱ्या 35 गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

आज पासून त्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्याबरोबर 35 गावातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

ठोस निर्णयापर्यंत उपोषण मागे नाही
आता जोपर्यंत ठोस उपाययोजना होणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याचे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केल आहे. ‘करो या मरो’ या भूमिकेतून या उपोषणाला ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –