उसाचे पाणी कुसळाला द्यायचे का म्हणणाऱ्यांना कळवळा का ? ; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजना गेल्या २५ वर्षापासून मार्गी लागावी यासाठी जनतेचा लढा सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील नेते ‘उसाचे पाणी कुसळाला’ दयायचे काय ? अशी टवाळी या योजनेबाबत करत होते. मात्र मतदारसंघात बदल झाल्याने या नेत्यांना साकळाई योजनेबाबत कळवळा आला आहे. राजकीय फायदयासाठी या योजनेचा वापर या नेत्यांकडून सध्या सुरू आहे. असा आरोप करत या नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता जनतेने लढा उभारला आहे. ही योजना विधानसभेच्या निवडणूकीपुर्वी मार्गी लागावी यासाठी दि .९ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू करणार आहे. साकळाईसाठी आता आरपारचा लढा देणार असल्याचे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सांगितले.

नगर तालुक्यातील वाळकी, देऊळगाव सिध्दी, गुंडेगाव, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी, रुई छत्तीशी आदी गावांमध्ये उपोषणाला मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप येवून राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी दिपाली सय्यद यांनी गावोगावी जनजागृती दौरा सुरु केला आहे. वाळकी येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य शरद बोठे होते.

यावेळी बाळासाहेब नलगे, कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, प्रविण शिंदे, उद्योजक विमल पटेल, प्रतिभाताई धस, माणिकराव पिंपळे, हनुमान सरोदे,पी.एस.बोरकर, संतोष हराळ, कुंडलिक गिरवले, सोमनाथ धाडगे, दिपक हराळ, प्रहार संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष डॉ.संदीप कुलांगे, प्रविण पिंपळे, अमोल लंके, भाऊसाहेब शिंदे आदी सह कृती समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणूक प्रचारसभेत वाळकी येथे साकळाई योजना विधानसभेपुर्वी मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, तर या योजनेसाठी पाणी शिल्लक नसल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन सांगतात. त्यामुळे या योजनेचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असल्याचा आरोप दिपाली सय्यद यांनी केला. या योजनेसाठी श्रीगोंद्यातील नेत्यांचा विरोध होता. मात्र आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आम्ही उभारलेल्या लढ्याचे श्रेय मिळविण्यासाठी आता आटापिटा करत आहेत. ही योजना विधानसभेपुर्वी मार्गी लागावी यासाठी मी दि .९ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू करणार आहे. योजनेतील लाभार्थी गावातील जनतेनी या लढयामध्ये मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन दिपाली सय्यद यांनी केले.

नारीशक्तीची ताकद दाखवावी

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावे कायम दुष्काळी आहेत. येथील शेती पावसावर अवलंबून आहे, मात्र आता दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाटाच्या पाण्याशिवाय या भागातील शेती पिकणार नाही. शेतीचे उत्पन्नच नसेल तर शेतकरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देवू शकणार नाही, त्यांचे भविष्य घडवू शकणार नाहीत. त्यामुळेच या लढ्यात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही या लढ्यात सहभागी होत नारीशक्तीची ताकद दाखवून द्यावी. असे आवाहन अभिनेत्री सय्यद यांनी उपस्थित महिलांना केले.

आरोग्यविषयक वृत्त –