कारसह डॉक्टरचे अपहरण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कंपनीतून घरी जात असताना कट लागल्याचा बहाणा करुन, कार अडवून, चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, कंपनीचे डॉक्टर यांचे कारसह अपहरण केले. अपहरण केलेल्या डॉक्टर यांना पुणे-सोलापूर रस्त्यावरील चौफुला येथील एका हॉटेलमध्ये सोडून दिले आणि अपहरणकर्त्यांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

डॉ. शिवाजी बबन पडवळ हे राठी पॉलीबॉण्ड नावाच्या कंपनीत तांत्रिक विभागाचे उपाध्यक्ष आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता काम संपवून ते परत आपल्या ड्रायव्हर जितेंद्र मनोहर भुजंग बरोबर कंपनीच्या मोटारीने घरी जात होते. दरम्यान, दाभाडे वस्ती चऱ्होली बुद्रुक येथे पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी मोटारीसमोर मोटारसायकल आडवी घालून कट का मारला यावरून भांडणे काढली. ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डॉ. शिवाजी पडवळ यांचे मोटारीसह अपहरण केले.

याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती मिळताच परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, चाकण विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत अलसटवार, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक लावंड, गुन्हे शाखेचे सुधीर अस्पत, उत्तम तांगडे, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र चौधर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन शहरात नाकाबंदी केली. एक पथक पुणे सोलापुर रोडवरील कडेगाव चौफुला भागात शोध घेत असताना डॉ. पडवळ यांच्या भावाच्या फोनवर फोन आला की डॉ. शिवाजी पडवळ यांना कडेगाव चौफुला येथील हॉटेल पंजाब ढाबा येथे ठेवण्यात आले. याठिकाणावरून त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, या ठिकाणी अपहरणकर्ते मिळून आले नाहीत. तसेच त्यांची होंडा सिटी देखील सापडली नाही. तपास दिघी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like