राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का ; ‘या’ मागण्यांसाठी डाॅ. अशोक विखे यांचे आमरण उपोषण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रवरा, गणेश, राहुरी या साखर कारखान्यांची थकित रक्कम द्यावी, देशद्रोही झाकिर नाईक यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणगीची सखोल चौकशी करण्यात यावी. आदी विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे पाटील हे 20 मे रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषणास बसणार आहे. त्यांच्या उपोषणाचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का ठरणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधातील मागण्यांसाठी अशोक विखे यांचे उपोषण आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवरा, गणेश, राहुरी या कारखान्यांने जाहिर केलेला उसाचा भाव 2525/- प्रमाणे पहिले पेमेंट अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही. ते तातडीने देण्यात यावे. देशद्रोही झाकीर नाईक च्या इस्लामिक रिसर्च फौंडेशन ने प्रवरा मेडिकल ट्रस्ट ला दिलेल्या कोट्यावधी रुपये डोनेशनची चौकशी झाली पाहिजे.

जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये भरलेल्या अनुकंपाच्या 100 जागाचा गैरव्यवहार व त्याविषयी तपासणी समितीचा अहवाल जाहीर करुन कार्यवाही झाली पाहिजे. 2004 ते 2009 जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत शालेय पोषण आहार यामध्ये मोठा भष्टाचार झाला असुन त्याची चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे. मुळा- प्रवरा विज संस्थेच्या 1400 कोटीच्या अपहाराची चौकशी झाली पाहिजे. मुळा – प्रवरा विज संस्थेला दर महा सरकार कडुन मिळालेली रक्कम ही सभासदांच्या नावे जमा करुन सभासदांची थकबाकी कमी करावी आदी मागण्यांसाठी 20 मे 2019 रोजी लोणी बुद्रुक येथील पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसणार आहे.