‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव म्हणजे काय ? काय आहेत फायदे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बघता बघता तो दिवस जवळ आला आहे ज्या दिवसाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते, व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.

गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी हा उत्सव म्हणजे एक नवीन इव्हेंटच बनवून ठेवला आहे. या गोष्टीमुळे सगळीकडे उत्सव कमी आणि दिखावूपणा जास्त होत आहे. यामुळे लोक पर्यावरणाचा विचार करत नाहीये. मीच का काळजी घेऊ असे म्हणून सगळे जण हा विषय टाळत आहेत. पण जर प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रीम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक शाडूच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचा वापर, तसेच सजावटीसाठी थर्माकोल चा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना आपल्याला पहायला मिळते.

eco friendly ganesha

हजारोंच्या वर गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे त्या पाण्यावर तरंगत असतात. हे बघून खऱ्या गणेशभक्ताचे मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करायला हवा. मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही आणि इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात. तसेच इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे व प्राकृतिक असतात. यामुळे कुठलीही हानी पोहचत नाही.

तुम्ही शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करू शकता. त्यानंतर त्या विरघळलेल्या मातीचा तुम्ही उपयोग देखील करू शकतात. या सर्व गोष्टी केल्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण पण सुरक्षित राहील. शेवटी तुमची इच्छा तुमचा निर्णय आहे. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !