इव्हीएममध्ये घोटाळा ; चौथे अन् पाचवे मतदान जात होते कमळाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडल्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर लोकसभा मतदार संघातील मीरापूर आणि कैराना क्षेत्रातील एका बुथवर ईव्हीएममध्ये प्रत्येक चौथे व पाचवे मत कोणालाही दिले तरी ते कमळच्या चिन्हावर जात असल्याचा प्रकार आढळून आला. बिजनोर क्षेत्राचे जिल्हाधिकारी आणि निवडणुक अधिकारी राकेश कुमार यांनी हे वृत्त फेटाळले असले तरी मॉक व्होटींगच्या वेळी अशा काही समस्या आढळून आल्यात्यानंतर त्या मशीन बदलल्या असल्याचा दावा केला आहे. भाजप मतदानाने नाही तर ईव्हीएम मशीनद्वारे विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने विजय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे जेथे जेथे ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत तक्रारी आल्या. त्या सर्व भाजपला मत जात असल्याचे आरोप करण्यात आले. तांत्रिक बिघाड असता तर दुसऱ्या कोणत्या पक्षाला न जात केवळ भाजपलाच कसे मत जाते, असा आरोप होऊ लागले आहेत.

या मतदान केंद्रावर हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशीनमधून बाहेर येत असल्याचे मतदानांनी सांगितले. याबाब समजताच सपा व बसपाचे उमेदवार घटनास्थळी पोहचले. कसौली येथील बुथ क्रमांक १६ येथे हत्तीचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मतदारांनी सांगितले की, ५ ते ७ मतदार मतदानांसाठी गेले होते. मात्र, हत्तीसमोरील बटण दाबल्यावर चौथे व पाचवे मतदान कमळाच्या चिन्हाला मिळत असल्याचे दिसले, असा आरोप केला आहे.

येथील उमेदवार मलूक नागर यांनी सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार चौथ्या ते पाचव्या क्रमांकाचे मत भाजपाला मिळत आहे. काही वेळा सलगही मतदान केल्यास व्हीव्ही पॅट मशिनमधून कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत होती.

देशात ९१ मतदार संघात मतदान घेण्यात आले. आंध्र प्रदेशामध्ये १०० ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ येथे काँग्रेसचे बटणच दाबले जात नसल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केला आहे.

You might also like