‘त्या’संबंधी ‘मिशन मोड’वर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बॅंकांना निर्देश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांना सध्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज आवश्यक आहे. त्यामुळे बॅंकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्जवितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करु नये. येत्या दोन आठवडयात बॅंकांना दिलेल्या खरीप कर्ज वाटपाचे अधिकाधिक उद्दिष्ट्य साध्य व्हावे, त्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात श्री. द्विवेदी यांनी सर्व बॅंकांच्या खरीप कर्ज वितरणाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. मीना, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी श्री. कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक (सहकार) हरिश कांबळे यांच्यासह विविध बॅंकांचे जिल्हा व्यवस्थापक व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. द्विवेदी यांनी प्रत्येक बॅंकांचा तपशीलवार आढावा घेतला. दिनांक 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत आणि त्यानंतर आजपर्यंत किती शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज वितरित केले, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. अपवाद वगळता बहुतांश बॅंकांनी अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज वितरणाबाबत वेगाने कार्यवाही केली नसल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.

बॅंकांनी त्यांच्या शाखेमध्ये कॅम्प आयोजित करुन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. खरिप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध झाले नाही, तर त्याचा काय उपयोग, अशा शब्दांत त्यांनी बॅंक प्रतिनिधींना सुनावले. कर्ज वितरणात एका आठवड्यात सुधारणा करा. कर्जवितरण ही बाब गंभीरपणे घ्या, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे कर्ज मागणी प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नका. वेळेवर आणि तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या. बॅंका अशी कार्यवाही करतात की नाही, हे जिल्हा अग्रणी बॅंक अधिकाऱ्यांनी बॅंकांना अचानक भेटी देऊन तपासावे, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी सांगितले.

बॅंकांच्या जिल्हा व्यवस्थापक आणि समन्वयकांनी कर्ज वितरणाबाबत त्यांच्या इतर बॅंकांच्या शाखा व्यवस्थापकांनाही माहिती द्यावी आणि कार्यवाही करण्यासाठी प्रेरित करावे, अशी सूचनाही त्यांनी दिल्या. त्यासाठी तालुका व गावपातळीवर शिबिरे घेऊन कागदपत्रांची पूर्तता आणि कर्जवाटपाचे काम व्हावे, असे ते म्हणाले.

याशिवाय, राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतक-यज्ञान्‍ज्ञतत्र्‍यांना दिलेल्या अनुदानाचे वाटपही धीम्या गतीने होत असल्याबाबत श्री. द्विवेदी यांनी नाराजी व्यक्त केली. बॅंकांनी त्यांच्याकडे दिलेल्या याद्यांनुसार संबधितांच्या बॅंक खात्यात अनुदानाची तसेच मदतीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बॅंकांमध्ये ही रक्कम वितरणाविना तशीच असल्याचे दिसते.

संबंधित बॅंकेच्या प्रमुखांनी सदर रक्कम शेतक-यांच्या खात्यांवर तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या बॅंक खात्यांबाबत त्रुटी किंवा अडचणी असतील, त्या संबंधित तालुक्यातील तहसीलदारांच्या निदर्शनास आणून द्या आणि दुरुस्ती झाल्यानंतर तात्काळ अनुदानाची रक्कम त्या खात्यांत वर्ग करा, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.