बांद्यातील महिलेला माकडतापाची लागण

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – बांदा, रत्नागिरी येथील सटमटवाडी येथे एका वर्षानंतर पुन्हा माकडतापाने डोके वर काढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील राजश्री केळुसकर (वय ४५) या महिलेला बांबोळी-गोवा येथे उपचारादरम्यान माकडतापाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एक वर्षापूर्वी वाडीत माकडतापाने १३ जणांचा बळी घेतला होता.

एक वर्षापूर्वी सटमटवाडी येथे माकडतापाने धुमाकूळ घातला होता. ऐन काजू हंगामात माकडतापाने उग्र रूप धारण केल्याने स्थानिकांनी काजू बागायतीत जाणे देखील सोडून दिले होते. वर्षभरापूर्वी या परिसरात शेकडो माकडे देखील मृतावस्थेत आढळली होती. वाडीतील १०० हून अधिक जणांना या तापाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा माकडतापाचा रुग्ण सापडल्याने स्थानिकांसह आरोग्य खात्यातही खळबळ उडाली आहे. राजश्री केळुसकर यांना मंगळवारी ताप येत असल्याने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आली होती.

मात्र तापाचे प्रमाण कमी होत नसल्याने व प्रकृती खालावल्याने तिला अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिला. नातेवाइकांनी उशिरा रुग्णास बांबोळी रुग्णालयात दाखल केले. तिच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता माकडतापाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या केळुसकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मात्र याबाबत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात काहीही नसल्याचे सांगण्यात आले.

Loading...
You might also like