झोपडीला आग लागून सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे आदिवासी समाजाच्या झोपडीला आग लागून दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळी ही दुर्घटना घडली.

निकिता विजय बर्डे (वय: तीन वर्षे), नेहा विजय बर्डे (वय : एक वर्ष) ही मयत चिमुरड्या मुलींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, बारागाव नांदूर येथील चौदा गाव पाणीपुरवठा योजनेलगत आदिवासी कुटुंबीयांच्या काही झोपड्या आहेत. सायंकाळच्या सुमारास अचानकपणे या झोपड्यांना आग लागली.

आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या. त्यातील विजय बर्डे यांच्या झोपडीत असलेल्या दोन मुलींचा जळूून दुर्दैवी मृत्यूू झाला. तसेच संसारोपयोगी सर्व साहित्य आगीत खाक झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच आ. शिवाजी कर्डिले, तहसीलदार मोहम्मद शेख, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे आदींनी बारागाव नांदूर येथे धाव घेतली.