शासनाचे दुर्लक्ष ; पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरु केली विनाअनुदानित ‘चारा छावणी’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे जनावरांसाठी चारा छावणी काढण्याची वारंवार मागणी केली. मात्र शासनाकडून दुर्लक्ष झाल्याने येथील पुरंदरच्या पूर्व पट्ट्यातील नावळी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शंभू सेना संघाच्या वतीने बलराम चारा छावणी सुरू केली आहे. ही छावणी शासनाचे सर्व नियम व अटी पाळून चालवली जाते. मात्र शासनाकडून कोणतीही मदत या छावणीला होत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे ना राजकीय नेत्यांचं लक्ष आहे ना निवडणुकीच्या कामात गुंग असणाऱ्या प्रशासनाचं.

संपूर्णपणे पावसावर अवलंबुन असणाऱ्या पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरंदरच्या पूर्वपट्ट्यात आणि बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा पाण्याची समस्या भेडसावत आहे. चारा छावणी सुरु करण्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली होती. मात्र शासकीय पातळीवरून पुरंदर तालुक्यात एकही चारा छावणी सुरु झाली नाही. त्यामुळे शेवटी नावळी येथील जगताप वस्ती येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शंभू सेना संघाचे कार्यकर्ते सागर जगताप यांच्या पुढाकारातून चारा छावणी सुरु केली. राज्यातील या पहिल्या विनाअनुदानित चारा छावणीत सध्या १०० जनावरे आहेत. अजूनही २५० जनावरांची छावणीत दाखल करण्यासाठी नोंद झाली आहे. छावणीचे संचालक सागर जगताप स्थानिक विविध संस्था संघटनांशी संपर्क साधून चारा-पाण्याची मदत गोळा करत आहेत. या जनावरांच्या चाऱ्यासाठी दररोज १०००० ते १५००० खर्च येत आहे. अजून जनावरे दाखल केली तर या चारा छावणीचा खर्च शेतकऱ्यांना परडवणार नाही.

या प्रकल्पाविषयी माहिती देताना संचालक सागर जगताप म्हणाले की, ‘नावळी येथे सुरू केलेल्या छावणीमध्ये २५० जनावरांची नोंद झाली असून सध्या १०० जनावरांचा सांभाळ करण्यात येत आहे. शासकीय मदतीशिवाय हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी देता यावे म्हणून या संस्थांकडून मदत घेतली जात आहे. ‘

तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे व शेतकऱ्यांना चारारूपी मदत करून शेतकऱ्याचं पशुधन वाचवावं. असे आवाहनही जगताप यांनी शासनाला केले आहे.