नायगाव येथे काळभैरवनाथ जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात राम नामाच्या गजरात फुलांची झालेली मुक्त उधळण, ” ओम जो जो रे वटूबाळा, निज निज भैरीवेल्हाळा ” या गीताने पाळण्याची भक्तिमय सुरवात, सिद्धेश्वर महाराज की जय,नाथ साहेबांच चांगभलं या जयघोषाने तयार झालेले मंत्रमुग्ध वातावरण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरीच्या मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

काळभैरवनाथ अष्टमी निमित्त सकाळी ७ वाजता श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची यांची महापुजा करण्यात आली. देवस्थानचे पुजारी सचिन जगताप यांनी श्रींची आकर्षक पूजा बांधली. सकाळी ८ वाजता महाआरती करण्यात आली.मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त सकाळी ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक (नागपूर ) यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर उद्योगपती भानुदास टेकवडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अष्ठमीनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ह.भ.प. रामकाका कड यांनी काळभैरवनाथ अष्टमीची माहिती दिली. त्यानंतर ७ वाजता चांदीच्या सजविलेल्या पाळण्यात उत्सव मूर्ती ठेवून श्री काळभैरवनाथ जन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वजण मंत्रमुग्ध होऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. त्यानंतर ७.१५ वाजता उत्सवमूर्ती सजविलेल्या पालखीतून, भाविकांसह ढोल, ताशांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरा बाहेर पडली. ग्रामप्रदिक्षणा झाल्यानंतर पालखी मंदिरात विसावली. अखंड हरिनाम सप्ताहाचे कौतुक केले जात होते. ट्रस्टच्या वतीने दर्शनबारी, पिण्याचे स्वच्छ पाणी, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आदि व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राहुल कड यांनी दिली.

अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ३३ वे वर्षे होते.यावेळी ह.भ.प.प्रविण महाराज लोळे, पारसनाथ मुथा, नामदेव आप्पा श्यामगावकर, प्रमोद महाराज जगताप, डॉ जलाल महाराज सय्यद, सदद्गुरू शांतीनाथ महाराज ,निवृत्ती महाराज देशमुख, सुदाम महाराज पानेगावकर आदि प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने झाली. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like