अर्बन बँकेत 30 कोटींचा अपहार ? माजी खा. दिलीप गांधी ‘गोत्यात’ येणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – नगरचे एम्स हॉस्पिटलचे डॉ. निलेश विश्‍वास शेळके, नगर अर्बन बँकेचे चेअरमन व माजी खा. दिलीप गांधी, सीए विजय मर्दा, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक प्रदीप पाटील व अन्य अधिकारी यांच्याविरोधात 30 कोटी रुपयांचा बोगस कर्ज प्रकरण करून अपहार केल्याची तक्रार डॉ. भास्कर सिनारे यांनी केली आहे. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या तक्रारीमुळे बँकिंग व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या तक्रारीत डॉ. सिनारे यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयीन शिक्षणापासून सन 1990 पासून डॉ. निलेश शेळके यांच्याशी माझ्यासह डॉ. रवींद्र कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. शशांक मोहळे आदींचे मैत्रीपूर्ण संबंध होते. यातूनच आम्ही डॉ. शेळके यांच्यासमवेत नगर शहरात जमिनीचे व्यवहार केले होते. सन 2008 मध्ये डॉ. शेळके यांनी नगर शहरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्हाला बरोबर घेऊन ड्रीम इन्व्हेस्टमेंट या नावाने जागा खरेदी केली होती.

यासाठी नगर अर्बन बँकेकडून डॉ. शेळके यांनी कर्जही घेतले होते. एम्समध्ये आम्हा चौघांसह एकूण 20 जणांना 30 लाख रुपये घेऊन डॉ. शेळके यांनी भागीदार करून घेतले होते. सन 2014 साली यासाठी शहर सहकारी बँकेने साडेसात कोटी रुपये कर्ज ट्रान्सफर करून घेतले. हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 2014 साली अद्यावत मशिनरी घेण्यासाठी अर्बन बँकेचे चेअरमन गांधी यांच्याशी कर्जाबाबत चर्चा झाल्याचे सांगून बँकेचे अधिकारी प्रदीप पाटील यांना कर्ज अर्ज घेऊन आमच्याकडे पाठविले होते. त्याचवेळी कोर्‍या कर्ज अर्जावर आमच्या स्वाक्षर्‍या घेतल्या.

त्यानंतर आम्ही कधीही बँकेत गेलो नाही, किंवा बँकेनेही बोलावले नाही. तसेच डॉ. शेळके यांच्या घरगुती कारणावरून हॉस्पिटल चालू होणे लांबणीवर पडले होते. त्यामुळे मशिनरी घेणे, इतर कर्ज वितरित होण्याची प्रक्रियाही थांबली होती. एम्सबाबत खरेदी कर्ज व अन्य बाबी डॉ. शेळके हेच बघत होते दि. 10 फेब्रुवारी 2016 रोजी अर्बन बँकेकडून कर्ज थकबाकीबाबत नोटीस मिळाली. त्यामुळे आम्ही याबाबत डॉ. शेळके व बँकेकडे चौकशी केली असता कर्ज परस्पर वितरित केल्याचे समजले. बँकेकडे वेळोवेळी कागदपत्रांची मागणी केली असता हा प्रश्‍न आम्ही व डॉ. शेळके सोडवू. त्यांनी काही रक्कम खात्यात भरली असल्याचे सांगितले.

बँकेने आमच्या नावे एकूण 18 कोटी रुपये वितरित केल्याचे समजले. आमच्या पत्नीच्या नावेही शहर बँकेकडून नोटीस आल्याने या दोन्ही बँकेकडून कर्ज घेतल्याचे समजते. त्यानंतर अर्बन बँक तसेच शहर बँकेच्या संचालकांनी डॉ. शेळके यांच्याबरोबर बैठक घेऊन हॉस्पिटल विकण्याचा सल्ला दिला. त्यातून सर्व कर्जप्रकरणे मिटविण्याचे आश्‍वासन दिले. आम्हास विश्‍वासात घेऊन एम्स विकण्याचा व्यवहार पूर्ण करण्यात आला. खरेदीसाठी दोन्ही बँकेने एकत्रित 14 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करून काही रक्कम अर्बनच्या खात्यावर भरून घेण्यात आली.

या व्यवहारात एकूण 7 कोटी रुपयांची फसवणूक डॉ. शेळके यांनी केली माहिती अधिकारात कर्ज कागदपत्रांची मागणी केल्यानंतर बँकेचे पदाधिकारी, डॉ. शेळके, विजय मर्दा, दिलीप गांधी यांनी कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा वापर करून कर्ज रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले सर्व रक्कम डॉ. शेळके यांनी स्वतःच्या फायद्याकरीता वापरली आहे.

दि. 28 मे 2014, दि. 22 मे 2014 असे मिळून पाच कोटी निर्मल एजन्सी या मशिनरी डिलरला दिल्याचे बनावट कागदपत्र बनविले आहेत. मात्र, मशिनरी रूग्णालयाला न देता या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणासाठी डॉ. शेळके यांनी अर्बनचे कर्मचारी, अधिकारी, दिलीप गांधी यांच्या संगनमताने परस्पर कर्ज वितरित करून निर्मल एजन्सी यांच्या खात्यात विनापरवानगी जमा केली. ही रक्कम अशोक बँकेत वर्ग करून आम्ही दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून 18 कोटींचा अपहार केलेला आहे.

या अपहाराबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दि. 26 जुलै 2017 रोजी तक्रार नोंदविण्यात आली आहे. याप्रकारे डॉ. निलेश शेळके, माजी खा. गांधी, विजय मर्दा, निलेश मालपाणी, प्रदीप पाटील व अन्य अधिकारी यांनी आमची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार पोलिसांत तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर अर्बन बँकेच्या संचालक मंडळासह सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे.

अनेक संचालक गुन्हा दाखल होण्याच्या भितीने गायब होते. मात्र पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तक्रार अर्ज स्वीकारत तो चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. या शाखेचे उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी यास दुजोरा दिला असून, चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –