कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा ‘सिद्धिविनायक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले आहे. घराघरामध्ये उत्साहाचे वातावरण असून गणेशाची लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण मनोभावे सेवा करत आहेत. गणेशोत्सवादरम्यान काही जण अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकमधील दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक. हा गणपती अष्टविनायकांपैकी एकमेक उजव्या सोंडेचा गणपती आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक. याचे देऊनळ अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक या छोट्याशा गावात आहे.

सिद्धटेक हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असून भीमा नदीच्या काठावर वसलेले हे छोटेसे गाव. अष्टविनायक गणपतीमधील दुसरा गणपती या गावात असल्याने या गावाला श्री क्षेत्र सिद्धटेक या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी वर्षभर गणेश भक्त येत असतात. या गणपतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…

विष्णूला सिद्धी प्रप्त करून दिली…
सृष्टीनिर्मितीच्या कार्यात ब्रह्मदेवाला अडथळे आणणाऱ्या मधु व कैटभ या राक्षसांना मारण्यास भगवान विष्णूस यश येत नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणेशस्तवन करण्यास सांगितले. विष्णूंनी गणपतीची ‘श्रीगणेशायनम:’ या षडाक्षरी मंत्राने आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन विष्णूला सिद्धी प्रदान केली व त्यानंतर विष्णूंनी मधु-कैटभ यांचे निर्दालन केले. ज्या ठिकाणी विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली त्याच ठिकाणी विष्णूंनी गंडकी शिलेची मूर्ती स्थापित केली. हाच सिद्धटेकचा सिद्धिविनायक. गणपतीचे देऊळ उत्तराभिमुख असून प्रत्यक्ष श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. त्यामुळे येथे कडक सोवळे पाळण्यात येते. माघ आणि भाद्रपद चतुर्थी तसेच अंगारिकेला येथे प्रचंड गर्दी असते. मंदिर पहाटे तीनच्या आसपास उघडले जाते ते रात्री चंद्रोदयानंतर तासाभराने बंद करण्यात येते. प्रमुख उत्सवाच्या वेळी श्रींच्या मूर्तीवर जडजवाहीर व दागिने चढविण्यात येतात. येथे नगर प्रदक्षिणेचे महत्त्व आहे. त्यामुळे दर्शनाला आलेला भाविक मंदिराऐवजी पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतो.

इतिहास
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

देऊळ
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

सिद्धटेकला कसे जाल
1. सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.
2. दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते.
3. पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –